ओमराजेंवर हल्ला करणारा तरुण जेरबंद

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळे या माथेफिरूस पोलिसांनी बुधवार, 16 ऑक्टोबरच्या रात्री पावणेबाराच्या सुमारास पाडोळी येथून जेरबंद केले. शिराढोण पोलीस ठाण्याचे सपोनि. शिवाजी गुरमे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

काल बुधवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व धाराशीव-कळंब मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कैलास पाटील हे कळंब तालुक्यात प्रचार करीत होते. नायगाव येथील सभा आटोपून परतत असताना तरुणांच्या घोळक्यातील अजिंक्य टेकाळे या माथेफिरूने खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा एक हात हातात घेऊन दुसऱया हाताने त्यांच्यावर चाकूचे वार केले. मात्र, खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रसंगावधान राखत आपला डावा हात मध्ये घातल्याने खासदार राजेनिंबाळकर यांना हाताच्या मनगटाला दुखापत झाली. हल्लेखोर अजिंक्य टेकाळे मात्र गर्दीचा फायदा घेत तेथून पसार झाला होता.

निंबाळकर यांनी याप्रकरणी स्वतः शिराढोण पोलीस ठाण्यात जाऊन हल्लेखोर टेकाळे याविरुद्ध फिर्याद दिली. टेकाळे हा त्याच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच सपोनि. शिवाजी गुरमे यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने धाड टाकून रात्री पावणेबाराच्या सुमारास टेकाळे यास जेरबंद केले. अजिंक्य टेकाळे याला धाराशीव येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हल्लेखोराचा व्हिडिओ व्हायरल

गुरुवारी सकाळपासूनच विविध समाजमाध्यमांवर अजिंक्य टेकाळे याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असून, यामध्ये त्याने आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बंडखोरी केली. यासह विविध आरोप केले आहेत. तसेच यामुळेच आपण हे पाऊल उचलल्याचे तो सांगत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या