माणुसकीला काळीमा! पोटच्या मुलाने बापाचा मृतदेह घेण्यास दिला नकार, नगर परिषदेने केला अंत्यसंस्कार

1918

माणुसकीला काळीमा फासणारी घटना बुधवारी धाराशिव जिल्ह्यात घडली. मेलेल्या बापाचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलानेच नकार दिल्याने या ’बेवारस’ मृतदेहावर धाराशिव नगर परिषदेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.

परंडा तालुक्यातील उकडगाव येथील एका महिलेस मागील आठवडय़ात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदरील महिलेच्या संपर्कातील म्हणून तिचा पती भागवत किसन पवार यांचा स्वॅब घेण्यासाठी परंडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांना दमा व अन्य रोगांचा त्रास होवू लागल्याने त्यांना धाराशिव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच दिवसापुर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला. मात्र सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सध्या कोरोनामुळे सगळीकडे भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोना मुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेल्यामुळे अनेकजण कोरोना पॉझिटीव्ह आल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र कोरोनाची बाधा नसतानाही भागवत किसन पवार यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास पोटच्या मुलानेच नकार दिला. अन्य नातेवाईकांनीही जबाबदारी झटकली. दोन दिवस अंत्यविधीविना मृतदेह जिल्हा रुग्णालयात पडून होता. दोन दिवस मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीच पुढे न आल्यामुळे पोलीस पंचनामा करून ’बेवारस’ अशी नोंद घेण्यात आली.

आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यास आपण असमर्थ असल्याचे लेखी निवेदन मुलाने परंडा पोलीस ठाण्यात दिले असल्याची माहिती आहे. त्यानुसार परंडा पोलिसांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करून सदरील माहिती दिली. त्यामाहितीच्या आधारे पोलीस पंचनामा करून सर्व कायदेशीरबाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर धाराशिव नगरपालिकेने चार कामगारांच्या मदतीने पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या