तानाजी सावंत यांची ‘खाज’ भागली! मराठा समाजाचा रुद्रावतार

सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली, असे बेताल वक्तव्य आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केल्याने मराठा समाजात प्रचंड संताप उसळला आहे. सावंतांना तत्काळ समज द्या, नाहीतर गंभीर परिणाम होतील, असा इशारा देत मराठा समाज समन्वयकांनी रुद्रावतार धारण केल्याने सावंतांची चांगलीच तंतरली. त्यानंतर सावंतांनी सपशेल माफी मागितली. पण या प्रकणामुळे त्यांची वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ‘खाज’ चांगलीच भागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मराठा समाजाकडून आरोग्य मंत्र्यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आगळंवेगळं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की, मागच्या काळात जेव्हा त्यांना मंत्री व्हायचं होतं, तेव्हा हेच मराठा तरुण कार्यकर्ते तुमच्यासाठी शिष्टमंडळ घेऊन जात होते, हे आपण विसरला आहात का? कुणाच्या ताकदीवर आणि कोणत्या गैरसमजात आपण हे वक्तव्य केलं आहे, असा थेट सवालच त्यांनी केला.

तुमच्या वागण्यामुळे मराठा समाजाची बदनामी

‘मराठा समाजातील 50पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान देऊन हा मराठा क्रांती मोर्चा उभा केला आहे. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचं आहे आणि कुणाचं नाही, याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. राज्यात कुणाचंही सरकार आलं तरी मराठा समाजाच्या तरुणांची मागणी आरक्षणाचीच होती आणि आरक्षणाचीच आहे. आरक्षण मिळेपर्यंत ही मागणी कायम राहील. आम्हाला टिकणारं आरक्षण पाहिजे. आमचं आरक्षण ओबीसीतून टिकणार असेल तर मराठा तरुण ओबीसीतून आरक्षण मागतील. तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात, एक जबाबदार व्यक्ती आहात. तुमच्या अशा वागण्यामुळे मराठा समाजदेखील बदनाम होतोय. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, आपण तानाजी सावंतांना तत्काळ समज द्यावी अन्यथा परिणाम गंभीर होतील, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी, असा इशाराच मराठा समाजाकडून सरकारला देण्यात आला.

काय म्हणाले तानाजी सावंत

शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी धाराशिवमध्ये हिंदू गर्व गर्जना संवाद यात्रेदरम्यान एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘‘फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं, पण त्याच ब्राह्मणानं 2017मध्ये मराठय़ांची झोळी भरली. तुम्ही सत्तेत आला तेव्हा सहाच महिन्यांत आरक्षण गेलं आणि मराठा आरक्षण गेल्यानंतर दोन वर्षं तुम्ही गप्प होता आणि आता सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली,’’ असं वक्तव्य सावंत यांनी केलं होतं.

सत्तेत आल्यावर आरक्षण बोचरं वाटतंय का?

मराठा आरक्षणाच्या बाबतीत तानाजी सावंत जे बोलले आहेत त्यावरून त्यांचे मंत्री पद ही जनता काढून घेऊ शकते… अनेकांनी आरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं. माझं असं म्हणणं आहे की, कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. आज सत्ता पक्ष… हे सर्व येत असतं, जात असतं. आरक्षणासाठी तुम्हीसुद्धा लढलात याचे भान ठेवायला पाहिजे. हेच आरक्षण आज सत्तेत आल्यावर का बोचरं वाटतंय? याचं उत्तर द्या, असे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले.

उपरतीमाफी मागितली

माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं म्हणत तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मात्र आम्हाला टिकाऊ आरक्षण पाहिजे आहे. त्यामुळे आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. यासंदर्भात आमच्या बैठका सुरू आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आम्हाला यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. सगळ्यांशी बोलून चर्चा करून याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत, अशीही सारवासारव तानाजी सावंत यांनी केली.

तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा!

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे-फडणवीस सरकारमधील आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी  केलेले विधान सत्तेचा माज दाखवते; पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहीत आहे. त्यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱया तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

सावंत यांची मस्ती वाढलीय

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे समस्त मराठा समाजाबाबत जे बोलले आहेत, ते अतिशय गंभीर आणि निषेधार्ह आहे. सावंत ज्या आत्मविश्वासाने बोलतात, त्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बोलण्याचे अधिकार दिल्याचे स्पष्ट दिसते. सावंत यांना पुढे करून भाजपचे लोक बोलत असून थोडक्यात काय तर सावंत यांची मस्ती वाढली आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.