>> तरंग वैद्य
खून आणि तपास अशी सामान्य वाटणारी, परंतु एक वेगळा विषय असणारी कथा. एलजीबीटीक्यू समाज, हत्या, पोलीस तपास, पाठलाग, संशयितांवर नजर, कुरघोडी, हत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न अशी बलस्थानं असणारी ‘मर्डर इन माहीम’ही वेबसीरिज नावापासूनच वेगळी ठरते.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विषय आणि शैलींवर आधारित मालिका येत आहेत. यात सर्वात मोठा आकडा अपराध किंवा मर्डर मिस्टरीवर आधारित वेब सीरिजचा आहे. एक किंवा अनेक हत्या आणि मग पोलीस तपास, पाठलाग, संशयितांवर नजर, कुरघोडी, हत्येमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न… ही अशा वेब सीरिजची बलस्थाने. अशीच एक वेब सीरिज जियो सिनेमावर 10 मे 2024 रोजी आली आहे. नावातच मालिकेची शैली अधोरेखित आहे. नाव आहे – ‘मर्डर इन माहीम!’
मुंबईतील माहीम भागात रात्री एक हत्या होते आणि पोलिसांचं काम सुरू होते. लगेच आणखी एक खून घडतो आणि मग मात्र खळबळ माजते. तपासातून कळते की, ज्या दोन्ही हत्या झाल्यात ते समलैंगिक होते. इथे एकूण प्रकाराला एक वेगळेच वळण लागते. एलजीबीटीक्यू म्हणजेच समलैंगिक समाज याविरुद्ध प्रदर्शन सुरू करून पोलीस आणि प्रशासनावर दबाव आणायचा प्रयत्न करू लागतो. इथे आपल्याला लक्षात येते की, कथा खुनाच्या तपासाची असली तरी मूळ कथा समलैंगिकता, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, या वृत्तीच्या लोकांची मानसिकता आणि समलैंगिकतेला कायद्याची वैधता मिळवून देण्याचा लढा यावर आधारित आहे. खरेच आहे, आपण यांना आपल्यातला मानत नाही. तसेच या वृत्तीला विकृती मानतो आणि या लोकांपासून अंतर ठेवून जगतो. आपल्या मित्रमंडळीत किंवा नातेसंबंधात असे कुणी आहे (ज्याला आपण बोलचालीच्या भाषेत ‘गुड’ म्हणतो) ही कुणकुण जरी लागली तरी आपण त्याचा पूर्ण छडा लावतो आणि मग स्वत त्या व्यक्तीपासून दूर तर होतोच, पण इतरांनाही सावध करतो. वर्ष 2018 मध्ये या समाजाला कायदेशीर मान्यता मिळाली असली तरी समाजाची वैधता मिळायला खूप मोठा काळ लागणार आहे. असो.
संपूर्ण कथा तपास अधिकारी इन्स्पेक्टर झेंडे पुढे घेऊन जातात. इथे विजयराज या गुणी कलाकाराला आपले अभिनय गुण दाखवण्याची भरपूर संधी मिळाली आहे. तपासात येणारे अडथळे आणि त्यांचा त्रास, वरिष्ठांचे नाहक बोलणे, मन मारून ऐकून घेणे, पारिवारिक कटकटी आणि वडिलांसोबत न पटणे या सर्वांची अभिव्यक्ती एक मुरलेला अभिनेताच साकार करू शकतो. शिवाय त्याची बरीच दृश्ये अभिनयसंपन्न नट आशुतोष राणासोबत आहे. दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी बघताना विशेष वाटते.
आशुतोष राणा एका निवृत्त पत्रकाराच्या, पीटरच्या भूमिकेत आहे. जेव्हा त्याला संशय येतो की, त्याचा मुलगा ‘गुड’ आहे तेव्हा त्याची, एका बापाची मानसिक अवस्था काय होते हे त्यांनी आपल्या डोळ्यांतून स्पष्टपणे दाखवली आहे. मुलाच्या विचारांसमोर त्याची हतबलता त्याच्या देहबोलीतून उत्तमरित्या समोर येते. पीटरची एक पूर्वकथा आहे, ज्यामुळे त्याच्या आणि झेंडेत छत्तीसचा आकडा आहे. पुढे दोघे एकत्र येऊन तपास करतात. दोस्ती आणि दुष्मनी दोन्ही अभिनेत्यांनी छान अभिनित केली आहे.
इतर कलाकारांमध्ये वरिष्ठ अभिनेता शिवाजी साटम आहेत. त्यांच्या अभिनयाबद्दल लिहिणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. ‘फु बाई फु’ने प्रसिद्धीस आलेल्या भारत गणेशपुरेंनी घाबरलेल्या पोलीस अधिकाऱयाची भूमिका छान निभावली आहे. शिवानी रघुवंशी इन्स्पेक्टर झेंडेच्या सहकाऱयाच्या भूमिकेत आहे. तिने संधीचे सोने केले आहे. राजेश खट्टर, दिव्या जगदाळे व इतर आपापल्या भूमिकेत योग्य.
मालिकेची पटकथा कथेला गती देत पुढे जाते, पण कुठेही भरकटत नाही. तसेच मुंबईतील चाळीतील चित्रीकरण खूप छान केले आहे. पोलीस स्टेशनची आंतरिक व्यवस्था, फायलींचे गठ्ठे, पोलिसांची घरे बघून मालिकेला एक खरेपणा आला आहे.
खून आणि तपास अशी सामान्य वाटणारी कथा असली तरी एक वेगळा विषय घेऊन आली आहे, जे नक्कीच स्तुत्य आहे. एलजीबीटीक्यू समाजाला त्रास देत नाही. उलट समाज त्यांना त्रास देतो, त्यांना हिणवतो, त्यांच्याकडे अपराधिक भावनेने बघतो हे या मालिकेतून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजाला बदलायची गरज आहे. आठ भागांची ही मालिका असून प्रत्येक भाग अंदाजे चाळीस-बेचाळीस मिनिटांचा आहे. शेवटपर्यंत रहस्य कायम ठेवत आपल्याला तपासात गुंतवून ठेवतो. त्यामुळे बघण्यास काहीच हरकत नाही.
– [email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)