सात हजारांवर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; 7 हजार 428 रुग्णांना प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची प्रतीक्षा

बदलत्या जीवनशैलीमुळे अवयव निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांमुळे किडनीवर परिणाम होऊन त्या निकामी होण्याचा धोका वाढल्याचे चित्र आहे. राज्यभरातील किडनी निकामी झालेले तब्बल 7 हजार 428 रुग्ण प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. यात सर्वाधिक रुग्ण हे पुणे आणि मुंबईतील आहेत.

मृत्यूनंतर एखाद्या व्यक्तीचे अवयव इतर गरजू रुग्णांच्या जगण्याचे कारण ठरू शकतात. मात्र, समाजात आजही अवयवदानाविषयी जागरूकता नाही. त्यामुळे राज्यात अवयव निकामी झालेल्या गरजू रुग्णांची प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक अवयवासाठी नोंदणी करणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यासह राज्यभरात हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुप्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे यांसारख्या अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू रुग्णांची संख्या 9 हजार 623 वर पोहोचली आहे. यात पुणे आणि मुंबई विभागांमध्ये सर्वाधिक रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई विभागात 4 हजार 706 तर पुणे विभागात 2 हजार 908 रुग्ण अवयवांसाठी प्रतीक्षेत आहेत. नागपूर विभागात १ हजार ३०५ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७०४ रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.

अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी व अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी अवयवाच्या प्रतीक्षेत असलेल्या गरजू रुग्णांसाठी आरोग्य विभागातर्फे राज्यभरात ३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘अवयवदान पंधरवडा आणि संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे. यात शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, आरोग्य संस्था सहभागी होत आहेत.

अवयवासाठी प्रतीक्षेत असलेले रुग्ण

किडनी 7428
यकृत 1963
हृदय 139
फुप्फुस 54
स्वादुपिंड 35