ओव्हरहेड वायर्सचे रेल्वे पुलाला दिलेले सपोर्ट न काढल्यास पूल कोसळण्याचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

ओव्हरहेड वायरींना अनेक ठिकाणी रेल्वेच्या पुलांना सपोर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुलावर लोड येत असून हे सपोर्ट काढून टाकावेत अन्यथा पूल कोसळू शकतात, असा सावधगिरीचा इशारा रेल्वे पुलांचे ऑडिट करणाऱ्या तज्ञांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिला आहे.

रेल्वे पुलांचे ऑडिट करणाऱ्या समितीमध्ये आयआयटी मुंबईतील तज्ञ तसेच महानगरपालिका आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लोकलना वीज पुरवण्यासाठी ओव्हरहेड वायर्स आहेत. या वायर्सच्या वजनाचा अंदाज घेतला तर ते एक हजार किलोवर जाऊ शकते. या वायर्सना करी रोड, चिंचपोकळी, परळ, भायखळा आणि ग्रॅण्टरोडच्या रेल्वे पुलाला सपोर्ट दिले गेले आहेत. त्यामुळे या पुलांना बराच लोड पडत आहे, असे समितीचे म्हणणे आहे.

यापूर्वी या समितीने घाटकोपर आणि वांद्रे पूर्व येथील रेल्वे पुलाचा सपोर्ट घेतलेल्या केबल्स काढून टाकाव्यात असा सल्ला दिला होता. या केबल्समुळे घाटकोपरचा रेल्वे पूल ४०० मिलीमीटरपर्यंत झुकल्याचे समितीच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मध्य रेल्वेला तेथील पादचारी मार्ग बंद करावा लागला. अशाच प्रकारे पत्री पूल म्हणून ओळखला जाणारा कल्याणचा रेल्वे पूल आणि भायखळय़ाच्या रेल्वे पुलालाही तडे गेल्याचे समितीला दिसून आले आहे.