ऑक्सिजनअभावी पुण्यात रुग्णाचा मृत्यू, तीन अत्यवस्थ रुग्णांना इतर रुग्णालयांत हलवले

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, बेडअभावी रुग्ण मरतील, ही भीती अखेर खरी ठरली. पुण्याजवळील शेवाळवाडी येथील योग मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्यामुळे एका अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांची एकच तारांबळ उडाली. प्रशासनाच्या वतीने रुग्णालयासाठी सात ऑक्सिजन सिलिंडर तातडीने पाठविण्यात आले. तीन अत्यवस्थ रुग्णांना इतर रुग्णालयांत हलविण्यात आले. प्रशासनाने पाठविलेल्या सिलिंडरमुळे इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी येथे योग हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. सध्या रुग्णालयामध्ये 40 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. 20 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. सध्या प्रशासनाने पाठविलेल्या ऑक्सिजनमुळे इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. अजून 22 ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा लवकरच होणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे रुग्णालयाला तात्पुरता सात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा झालेला आहे. रुग्णालयातील स्टाफ रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार करीत आहे. जागा उपलब्ध होईल तसे काही रुग्णांना हलविले जाईल, अशी माहिती योग हॉस्पिटलचे डॉ. अभिजित दरक यांनी दिली.

‘योग हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. याबाबत मी स्वतः जिल्हाधिकाऱयांशी बोललो आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा रुग्णालयाला केला जाईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. प्रशासनास योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत,’ अशी माहिती आमदार चेतन तुपे यांनी दिली.

गेल्या दोन दिवसांपासून द्रव ऑक्सिजनच्या कमतरतेशी रुग्णालय झगडत असून, त्यांच्याकडे फक्त एक तासाचा पुरवठा शिल्लक असल्याची माहिती डॉ. अभिजित दरक यांनी दिली आहे. सध्या पुरवठा झालेला ऑक्सिजन दोन दिवस पुरेल, असे ते म्हणाले. ऑक्सिजन सिलिंडर कोठेच उपलब्ध नसल्याने ते मिळत नाहीत. त्यामुळे आम्हाला व्हेंटिलेटरवर असणाऱया रुग्णांना दुसरीकडे हलवावे लागत आहे, असेही डॉ. दरक यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या