SIR म्हणजे महाघोटाळा! चिदम्बरम यांचा केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा

काँग्रेस नेते खासदार आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी SIR वरून केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. SIR म्हणजे महाघोटाळा असल्याचा आरोप चिदम्बरम यांनी केला आहे. पी. चिदम्बरम यांनी तामिळनाडूमधील पुडुकोट्टाई येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

SIR ला आमचा विरोध नाही. पण तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने SIR ची अंमलबजावणी करण्यात आली त्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली आहे. जे लोक हयात आहेत त्यांची नावे यादीत नाहीत, यावरून हे स्पष्ट झाले आहे. ६६ लाख ४४ हजार नागरिकांचे पत्तेच नाहीत, हा निवडणूक आयोगाचा दावा हास्यास्पद आहे. आणि हा एक महाघोटाळा आहे, असा आरोप चिदम्बरम यांनी केला.

“भाजपने दुसऱ्यांदा गांधींची हत्या केली”

केंद्रातील भाजप सरकारने दुसऱ्यांदा महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. केंद्र सरकारने अलिकडेच आणलेल्या रोजगार हमी कायद्यामुळे आर्थिक बोजा हा राज्य सरकारांवर पडणार आहे. नव्या कायद्यानुसार काम मिळण्याची कुठलीही हमी नाही. केंद्र सरकारने या योजनेला नवीन नाव दिले आहे. हे नाव बोलणंही कठीण आहे आणि समजणंही. नव्या कायद्यानुसार १२५ दिवस रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. मग १२५ दिवसच का? २५० दिवस रोजगार का नाही? वास्तवात हे सरकार फक्त ५० दिवसांचेच काम देणार आहे, अशी टीका चिदम्बरम यांनी ‘विकसित भारत जी राम जी’ कायद्यावरून केंद्र सरकारवर केली. ‘विकसित भारत जी राम जी’ हा रोजगार हमीचा नवा कायदा असून ‘मनरेगा’ योजना इतिहासजमा झाली आहे.