‘सिंधु’स्थान! नोझोमी ओकुहराला हरवत जागतिक स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली

344

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत इतिहास रचणाऱया हिंदुस्थानच्या पी. व्ही. सिंधू हिने रविवारी आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला. हिंदुस्थानच्या या शटलक्वीनने जपानच्या नोझोमी ओकुहरा हिचा 21-7, 21-7 अशा फरकाने धुव्वा उडवत वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा पहिल्यांदाच जिंकण्याचा पराक्रम केला. गेल्या 42 वर्षांच्या इतिहासातील हिंदुस्थानचे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्ण पदक ठरले हे विशेष. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने पी. व्ही. सिंधूला 20 लाखांचे तर साईप्रणितला 5 लाखांचे बक्षीस जाहीर केले.

आईला वाढदिवसाचे गिफ्ट
पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. ती यावेळी म्हणाली, माझ्या आईचा आज वाढदिवस आहे. हे जेतेपद माझ्याकडून तिला गिफ्ट आहे. दोन वेळा मला फायनलमध्ये हार पत्करावी लागली होती. त्यामुळे यंदाचे जेतेपद माझ्यासाठी स्पेशलच आहे. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांसह पुलेला गोपीचंद, किम ह्यून या प्रशिक्षकांसह सपोर्ट स्टाफ यांचेही आभार मानते, असे ती पुढे म्हणाली.

37 मिनिटांत खेळ खल्लास
पी. व्ही. सिंधू आणि नोझोमी ओकुहरा यांच्यामधील जेतेपदाची लढत चुरशीची होईल अशी शक्यता क्रीडा वर्तुळात रंगली होती. मात्र पी व्ही सिंधूच्या झंझावाती खेळासमोर प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभाव लागला नाही. पी. व्ही. सिंधूने अवघ्या 37 मिनिटांत ही लढत जिंकली. पी. व्ही. सिंधूने दोन्ही गेम प्रत्येकी 21-7 अशा फरकाने जिंकले.

तिसऱया प्रयत्नात यश
पी. व्ही. सिंधू हिला दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती. 2017 सालच्या स्पर्धेत नोझोमी ओकुहरा हिने ग्लासगो येथे झालेल्या जेतेपदाच्या लढतीत पी. व्ही. सिंधूला हरवले होते. त्यानंतर 2018 साली नानजिंग येथे झालेल्या स्पर्धेत कॅरोलिन मरीनने पी. व्ही. सिंधूला नमवले होते. अखेर हिंदुस्थानच्या या ‘फुलराणी’ला यंदा सूर गवसला. तिने 2017 साली झालेल्या पराभवाची परतफेडही रविवारी केली.

पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पाच पदके पटकाविली आहेत. यामध्ये प्रत्येकी दोन रौप्य व दोन कांस्य आणि एक सुवर्ण पदकाचा समावेश आहे. याआधी हिंदुस्थानकडून प्रकाश पडुकोण, बी साई प्रणीत, सायना नेहवाल,ज्वाला गुट्टा/अश्विनी पोनप्पा यांनी या मानाच्या स्पर्धेत पदके जिंकली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या