
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एचडीआयएलचे प्रमोटर राकेश वाधवान यांच्यावर पेसमेकर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुंबईतील सरकारी जे.जे. रुग्णालयात करता येईल, अशी माहिती गुरुवारी तुरुंग प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या 4355 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान, दलजीत सिंग पाल, गुरुनाम सिंग होठी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या राकेश वाधवानची तब्येत खालावल्याने पालिकेच्या केईएम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका वाधवानने उच्च न्यायालयात केली आहे. गेल्या सुनावणीदरम्यान, शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयांतील सुविधा आणि उपलब्धतेबाबत माहिती देण्यात यावी, सुविधा नसल्यास वाधवान स्वतःच्या खर्चाने शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाची निवड करू शकतात, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी जे.जे. रुग्णालयात डय़ुअल चेंबर पेसमेकर इम्प्लांटेशनची सुविधा उपलब्ध असून त्यासोबतच पोस्ट-ऑप आयसीसीयू मॉनिटरिंग सुविधा असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. त्यावर उत्तर सादर करण्यासाठी वाधवनच्या वतीने अवधी मागण्यात आला. तो मान्य करत न्यायालयाने सुनावणी 11 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.


























































