
ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा सोहळा रत्नागिरीत होणार आहे. शनिवार दि.14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वा. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर आणि केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जयू भाटकर, माधव अंकलगे, विनायक हातखंबकर, अभिजित हेगशेट्ये, आनंद शेलार उपस्थित होते. ते म्हणाले, महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि ‘कोमसाप’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा रंगणार आहे. यावेळी मधुभाईंच्या समृद्ध जीवनप्रवासावर आधारित एक विशेष ‘प्रकट मुलाखत’ साहित्यिक अशोक बागवे, कवी अरूण म्हात्रे, नमिता कीर आणि प्रा. डॉ. प्रदीप ढवळ हे घेणार आहेत. सत्कार सोहळ्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, कोमसापचे विश्वस्त आमदार संजय केळकर, विश्वस्त रेखा नार्वेकर, प्रा. एल. बी. पाटील, अनुप कर्णिक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील रसिक, तरुण लेखक आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


































































