राज्याच्या, समाजाच्या विकासात योगदान देणाऱयांच्या सन्मानासाठी पद्म समिती काम करेल!

697

पद्म पुरस्कार शिफारस समितीची पहिली बैठक गुरूवारी सह्याद्री अतिथीगृह येथे समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत राज्यातून मागील काही वर्षांमध्ये केंद्राकडे शिफारस करण्यात आलेले प्रस्ताव आणि त्यापैकी प्रत्यक्ष पुरस्कार किती मिळाले याची माहिती घेऊन त्या अनुषंगाने विश्लेषण करण्यात यावे, अशा सूचना  विभागातील अधिकाऱयांना देण्यात आल्या. राज्याच्या आणि समाजाच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱया मान्यवरांची या पुरस्कारांसाठी शिफारस करुन त्यांच्या कार्यास उचीत सन्मान देण्यासाठी समिती काम करेल, असे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

26 जानेवारी 2021 रोजी घोषीत होणाऱया पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील मान्यवरांच्या नावाची केंद्र शासनाकडे शिफारस करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीला समितीचे सदस्य मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायमंत्री सुनील केदार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर उपस्थित होते. समिती सदस्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले. वेगवेगळ्या क्षेत्रात अत्युत्कृष्ट कामगिरी करुन योगदान देणाऱया मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस केली जाते. बैठकीत या अनुषंगाने चर्चा झाली. महाराष्ट्र हे देशातील प्रगत, सुधारणावादी राज्य आहे. राज्यात विविध क्षेत्रात कार्य करुन समाजाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी अनेक मान्यवरांनी योगदान दिले आहे. अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची समितीमार्फत पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात येईल, जेणेकरून केंद्र शासनाकडूनही त्यांच्या कामाची देखल घेतली जाईल, अशी चर्चा यावेळी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या