‘पैठणी’चे राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रभाकर ढालकरी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैठण येथील ‘पैठणी’ साडीचे जुन्या काळातील विणकर प्रभाकर अंबादास ढालकरी (90) यांचे निधन झाले. केंद्र सरकारने त्यांना हस्तकलेच्या क्षेत्रातील ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या पश्चात 2 मुले, 3 मुली, जावई, सुना, नातू व पणतू असा परिवार आहे. गोदाकाठी ‘दक्षिण-काशी स्मशानभूमी’त त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पैठणी विणकर राजेंद्र व मदनलाल यांचे ते वडील होत.

कै. प्रभाकर ढालकरी हे महाराष्ट्र शासनाच्या ‘मर्‍हाटी पैठणी साडी केंद्र’ येथे पैठणी साडी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. शेकडो प्रशिक्षणार्थी विणकरांना प्रशिक्षित केले. यानंतर पैठण येथे ‘पूनम पैठणी साडी सेंटर’ची उभारणी करुन पैठणी साडी निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सुरु केला. या सेंटरमध्येही त्यांनी केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे पैठणीचे प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. पारंपरिक पैठणी साडीची कला जिवंत राहिली. तसेच विणकरांना स्वत:चा व्यवसाय करता यावा. यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. पैठणी विणकर म्हणून नव्या पिढीला प्रेरित करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. कै. प्रभाकर ढालकरी यांच्या पैठणी साडी विणकर निर्माण कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना तत्कालीन राष्ट्रपती कै. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते दिल्ली येथे राजभवनात राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करुन सन्मान केला होता.