पाहुण्या बांगलादेश क्रिकेट संघाने नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली रावळपिंडीमध्ये इतिहास घडविला. त्यांनी दुसऱया कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सनी धुव्वी उडवला आणि मालिकेत 2-0ने निर्भेळ यश संपादन करताना पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांचे नाक कापले. बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या ऐतिहासिक विजयात मेहंदी हसन मेराज, लिटन दास, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी बहुमोल भूमिका बजावली.
बांगलादेशने पहिल्या कसोटी बाजी मारत पाकिस्तानला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच हरविले होते. त्यामुळे कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी यजमान पाकिस्तानला दुसरी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकायची होती. मात्र, शान मसूदच्या पाकिस्तानला बांगलादेशने चारी मुंडय़ा चीत करून कसोटी क्रिकेटच्या इतिहात नवा अध्याय लिहिला. पहिल्या डावात 138 धावांची दमदार खेळी करणारा लिटन दास या कसोटीचा मानकरी ठरला, तर मालिकावीराचा बहुमान मेहदी हसन मिर्झाला मिळाला. दुसऱया कसोटीचा पहिला दिवस पावसात वाहून गेला. मग पाकिस्तानने 274 धावसंख्या उभारल्यानंतर बांगलादेशला 262 धावांवर रोखून पहिल्या डावात 12 धावांची अल्पशी आघाडी घेतली होती. मात्र, पाकिस्तानचा दुसरा डाव केवळ 172 धावांवरच गारद झाल्याने बांगलादेशला 185 धावांचे माफक लक्ष्य मिळाल्याने त्यांनी येथेच अर्धी लढाई जिंकली होती.