पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये संघर्ष पेटला, 50 हून अधिक ठार

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष अधिकच चिघळला आहे. दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांवर केलेल्या जोरदार हल्ल्यांत सैनिक व सामान्य नागरिकांसह 50 ठार झाले, तर शेकडो जखमी झाले आहेत.

मागील आठवडय़ात अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले. हे बॉम्बस्फोट आयएसआयची फूस असलेल्या पाकिस्तानी तहरिक-ए-तालिबनाच्या दहशतवाद्यांनी घडवल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला. तसेच या हल्ल्याचा सूड म्हणून अफगाणी तालिबानच्या सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या 25 चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यात पाकचे 23 सैनिक मारले गेले. पाकनेही त्यास उत्तर दिले. हा संघर्ष थांबल्याचे वाटत असतानाच मंगळवारी रात्री पुन्हा धुमश्चक्री उडाली.

48 तासांची शस्त्रसंधी

अफगाणिस्तानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने काबूल व कंदहारवर हवाई हल्ले केले. अफगाणिस्ताननेही सीमेवरील प्रतिहल्ले तीव्र केले. यात मोठी हानी झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी उच्चस्तरीय चर्चा करून 48 तासांची शस्त्रसंधी जाहीर केली.

रणगाडे रस्त्यावर

अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील स्पिन बोल्डक प्रांतात अफगाणी सैनिकांनी पाकिस्तानच्या दिशेने गोळय़ांचा आणि उखळी तोफांचा वर्षाव केला. यावेळी चक्क रणगाडे रस्त्यांवर उतरले. सीमेवर असलेले पाक-अफगाण मैत्री द्वारही उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानी सैनिकांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या धुमश्चक्रीत 50 हून अधिक लोकांचा बळी गेला. दोन्ही देशांनी एकमेकांचे जास्तीत जास्त नुकसान केल्याचा दावा केला आहे.