Operation Sindoor नंतर पाकिस्तानचा सीमेवर तुफान गोळीबार, पूँछमधील 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी

ऑपरेशन सिंदूरमुळे बिथरलेल्या पाकिस्तान बुधवार सकाळपासून पूँछ व तंगधार येथील सीमाभागात गोळीबार करत आहे. या गोळीबारात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला तर 43 जण जखमी झाले आहेत. दरम्यान जम्मू कश्मीर सीमेवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व सीमाभागातील जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. यावेळी ओमर अब्दुल्ला यांनी प्रत्येक सीमावर्ती जिल्ह्यांना 5 कोटी रुपये आणि इतर जिल्ह्यांना प्रत्येकी 2 कोटी रुपयांचा आकस्मिक निधी तात्काळ जारी करण्याचे निर्देश दिल्याचे कळते. या निधीमुळे जिल्हाधिकाऱ्यांना उद्भवणाऱ्या आणि पुरेशा संसाधनांची उपलब्धता आवश्यक असलेल्या आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी सज्ज राहता येईल असे सांगण्यात आले आहे.

 

गुरुद्वाराचे मोठे नुकसान

पाकिस्तानने केलेल्या गोळीबार व तोफगोळ्यांच्या हल्ल्यात पूँछ जिल्ह्यातील गुरू सिंग सभा गुरुद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे.