
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे बिथरलेल्या पाक सैनिकांनी जम्मू आणि कश्मीर नियंत्रण रेषेवरील पूंछ, राजौरी, बारामुल्ला आणि कुपवाडा येथील गावांवर बुधवारी तोफगोळय़ांचा अंदाधुंद मारा केला. यात 15 नागरिक ठार झाले आहेत. मृतांमध्ये चार मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. याशिवाय 50 हून अधिक जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती गंभीर आहे. पाकच्या हल्ल्यापासून वाचण्याकरिता जम्मू-कश्मीरमधील भारत-पाक सीमेवरील गावातील शेकडो रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर काही वेळातच सीमेपलीकडून तोफगोळय़ांचा मारा सुरू झाला. दुपारपर्यंत हा मारा सुरू होता. भारतीय सैन्यानेही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. यात शत्रूच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. पाककडून सलग तेरा दिवस गोळीबार सुरू आहे. या हल्ल्यात सर्वाधिक नुकसान पूंछ जिह्यात झाले. येथील डझनभर घरे उद्ध्वस्त करण्यात आली. सर्व मृत नागरिक पूंछमधील आहेत. अंदाधुंद गोळीबारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बारामुल्लातील उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात पाच अल्पवयीन मुलांसह दहा जण जखमी झाले, तर राजौरी जिह्यात तीन जण जखमी झाले. कुपवाडा जिह्यातील कर्नाह सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात अनेक घरांना आग लागली.
मृतांची नावे
बलविंदर कौर ऊर्फ रुबी (33), मोहम्मद जैन खान (10), त्याची मोठी बहीण झोया खान (12), मोहम्मद अक्रम (40), अमरिक सिंग (55), मोहम्मद इक्बाल (45), रणजीत सिंग (48), शकिला बी (40), अमरजीत सिंग (47), मरियम खातून (7), विहान भार्गव (13) आणि मोहम्मद रफी (40).
पंजाब, राजस्थान, कश्मीरमधील शाळा बंद
सीमेवरील तणावामुळे जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच पंजाबमधील फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, अमृतसर आणि गुरुदासपूर या सीमावर्ती जिह्यांमधील सर्व शाळा बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. पुढील दोन दिवसही शाळा बंद राहतील. राजस्थानच्या गंगानगर, बिकानेर, जैसलमेर आणि बारमेर या चार सीमावर्ती जिह्यांमधील शाळा ठेवण्यात आल्या.