द्रविडकडून काहीतरी शिकायला हवं! आफ्रिदीचा पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना सल्ला

‘टीम इंडिया’चा माजी कर्णधार राहुल द्रविडने वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपद प्रामाणिकपणे नाकारून युवा पिढीला घडविण्यास प्राधान्य दिले. ते 19 वर्षांखालील आणि हिंदुस्थान ‘अ’ संघांचे प्रशिक्षकपद स्वीकारून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत नवी पिढी घडवत आहेत. दुसरीकडे मात्र पाकिस्तानी क्रिकेटची पार वाट लागली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी राहुल द्रविडकडून काहीतरी शिकायला हवे, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आफ्रिदीने आपल्या देशाच्या माजी खेळाडूंना दिला आहे.

न्यूझीलंड दौऱयावर पाकिस्तानला टी-20 मालिकेत 1-2, तर कसोटी मालिकेत 0-2 फरकाने हार पत्करावी लागल्यानंतर शाहिद आफ्रिदीने नाराजी व्यक्त केली. लाहोरमधील एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा क्रिकेटपटूंची मजबूत फळी निर्माण केली आहे. हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱयावर बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना दुखापत झाल्यानंतरही युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचा यशस्वी प्रतिकार केला. याचे सर्व श्रेय द्रविडला जाते. द्रविडकडून हीच गोष्ट पाकिस्तानच्या माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी शिकायला हवी, असेही तो म्हणाला.

पाकिस्ताननेही युवा क्रिकेटपटू घडवायला हवेत!

इंझमाम उल हक, युनूस खान व मोहम्मद युसूफ या दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तानातील युवा पिढीला घडवायला हवे. सध्या पाकिस्तानी क्रिकेटची रया गेलेली आहे. पाकिस्तानातील युवा खेळाडूंना माजी क्रिकेटपटूंच्या मार्गदर्शनाची गरज आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यात लक्ष घातल्याशिवाय काहीच होणार नाही, असे मतही शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या