पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने रियासी हल्ल्याचा केला निषेध, शेअर केली पोस्ट

जम्मू काश्मीरमधील रियासी येथे हिंदू भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 11 जण मृत्युमुखी पडले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

या घटनेने संपूर्ण जगभरात खळबळ उडाली. अनेक देशातून त्याचा निषेध झाला. दरम्यान पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज हसन अली याने देखील रियासी येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सध्या व्हायरल होत असलेली ”ALL EYES ON VAISHNO DEVI ATTACK” ही पोस्ट त्याने शेअर केली आहे. त्याने इंस्टा स्टोरी देखील ठेवली असून त्याच्या या पोस्टचे लोकं कौतुक करत आहेत. दरम्यान हसन अलीची पत्नी सामिया हिने देखील ही स्टोरी पोस्ट केली असून तिने SAVE MANIPUR या आशयाची स्टोरी देखील शेअर केली आहे.

हसन अलीने ट्विटवरवरून देखील याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ”दहशतवाद आणि हिंसाचार एक गंभीर मुद्दा आहे. मग तो कोणत्याही जाती किंवा धर्मा विरोधात असो. म्हणून मी ही पोस्ट शेअर करत आहे. मी जसं शक्य असेल व जिथे शक्य असेल तिथून शांततेचे समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. मी कायम गाझामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे. जिथे जिथे निष्पाप लोकांना मारलं जाईल. तिथे मी हे करणार. प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा आहे. अल्लाह जीव गेलेल्या लोकांना जन्नतमध्ये सर्वोच्च स्थान देईल, अशी पोस्ट हसन अलीने शेअर केली आहे.