पाकिस्तानकडून हिंदुस्थानी जहाजांना ‘नो एण्ट्री’, नौदलाकडून व्यावसायिक जहाजांसाठी नेव्हेगेशन अलर्ट

हिंदुस्थानकडून आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही आपल्या बंदरांमध्ये हिंदुस्थानी ध्वज फडकावणाऱ्या जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानमधून आयात थांबवल्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. पाकिस्तानातून आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्यात आली असून टपाल आणि पार्सल सेवाही बंद करण्यात आली आहे. एखाद्या तिसऱ्या देशांद्वारे आलेली पाकिस्तानी उत्पादनेही हिंदुस्थानात आयात करण्यावर बंदी असणार आहे.

दुसरीकडे अरबी समुद्रात सुरू असलेल्या हिंदुस्थानी नौदलाच्या सरावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी सागरी अधिकाऱ्यांनी व्यावसायिक जहाजांसाठी नेव्हिगेशन अलर्ट जारी केला आहे. हिंदुस्थानी नौदलांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय जलविज्ञान कार्यालयाकडून नेव्हिगेशन इशारा जारी केला जातो. सुरक्षिततेसाठी व्यावसायिक जहाजांना या क्षेत्रापासून दूर राहण्याचा सल्ला जारी केला आहे. दरम्यान, पाकिस्तानी सागरी सैन्याने आधीच अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सागरी सैन्याचा अरबी समुद्रात कवायती आणि थेट गोळीबार सराव सुरू आहे.

गुप्तचर यंत्रणांनी दिला होता इशारा

पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच श्रीनगर आणि आणि आसपासच्या हॉटेलमध्ये राहणाऱ्या पर्यटकांवर हल्ला होण्याची आगाऊ माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकारकडे दिली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. गुप्तचर यंत्रणांशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर श्रीनगर आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

सीमेवर गोळीबार सुरूच; सलग दहा दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. सलग दहाव्यांदा पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-कश्मीरमधील विविध सेक्टर्समध्ये गोळीबार करण्यात आला. यात कुणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडले नसल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. कुपवाडा, बारामुल्ला, पूँछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनुर येथे पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने गोळीबार सुरू असल्याचे चित्र आहे.

आम्हाला मित्रांची गरज, उपदेश देणाऱ्यांची नाही

हिंदुस्थानला मित्रांची गरज आहे, केवळ उपदेश देणाऱ्यांची नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भू-राजकीय मुद्द्यांवरून युरोपला सुनावले आहे. हिंदुस्थानला परस्पर आदर आणि समजूतदारपणा दाखवणाऱ्या देशांसोबत काम करायचे आहे. काही युरोपीय देश अजूनही त्यांच्या मूल्य आणि कृतीतील तफावतीशी झुंजत आहेत. जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपण उपदेशकांचा नाही तर भागीदारांचा शोध घेतो, असे जयशंकर यांनी म्हटले आहे.

एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग, मोदी यांच्यात चर्चा

एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या 7 लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान आणि एअर चीफ मार्शल यांच्यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.