
आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीत इतर देशही होरपळून निघाले आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला. यानंतर आता पाकिस्तानमध्येऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात कऱण्यासाठी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कठोर पावले उचलली आहेत. 7 एप्रिलपासून देशभरातील बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स आणि दुकाने रात्री 8 वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब, बलुचिस्तान, इस्लामाबाद आणि Pok सह अनेक ठिकाणी हे नियम कडकपणे लागू केले जाणार आहेत. खैबर पख्तूनख्वामधील काही महत्त्वाच्या शहरांना मात्र रात्री 9 वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे. व्यावसायिक ठिकाणांशिवाय लग्न समारंभ, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना देखील रात्री 10 वाजेपर्यंतचीच वेळ देण्यात आली आहे. औषधांची दुकाने मात्र या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे आणि जागतिक बाजारपेठेत इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तान सरकारवर हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. इराणने जागतिक तेल पुरवठा करणारा महत्त्वाचा सागरी मार्ग ‘होर्मुझची सामुद्रधुनीही बंद केल्यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचा थेट फटका पाकिस्तानला बसला असून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला पेट्रोलचे दर प्रति लिटर 458 रुपयांच्या पार गेले होते, तर डिझेल 520 रुपयांवर पोहोचले होते. सरकारने आता त्यात थोडी कपात करून पेट्रोल 348 रुपयांपर्यंत कमी केले असले, तरी सामान्य जनतेच्या खिशाला परवडणारे नाहीएत. तेलाच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही भागांत महिनाभर मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा देण्याची घोषणा सरकारने केली आहे.


























































