पाकिस्तानातही गिरवले जाताहेत मायमराठीचे धडे

कराचीमध्ये भोसले, जाधव, गायकवाड, सांडेकर, खरात, नाईक अशा आडनावाची मराठी कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. साधारण दीडशेपेक्षा अधिक कुटुंब कराचीत आहेत. त्यातील नव्या पिढीला फारसे मराठी बोलता येत नाही. आपल्या मुलांना चांगले मराठी बोलता यावे, अशी या कुटुंबांची इच्छा आहे. ही इच्छा दिलीप पुराणिक यांच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. पुराणिक यांनी कराची येथील महाराष्ट्र पंचायत संस्थेच्या सदस्यांना शिकवायला सुरुवात केली आहे.

 दिलीप पुराणिक गेल्या दोन महिन्यांपासून गुगल मिटच्या माध्यमातून दर रविवारी मराठीचे वर्ग चालवत आहेत. ते बाराखडी, मराठी सणांची माहिती, श्लोक- आरती, बालसंस्कार या संदर्भातील क्हिडीओ – ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून शेअर करतात. त्याचा आधार घेऊन मोडके तोडके मराठी कराचीतील मंडळी आता बोलू लागली आहेत. पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत अस्खलित मराठी बोलण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

 दैनिक ‘सामना’शी संवाद साधताना पुराणिक म्हणाले, मागील दोन वर्षांत सोशल मीडियाच्या माध्यमातून मी अनेक देशांतील मराठीजनांच्या संपका&त आलो. विशाल राजपूत हा त्यापैकीच एक. तो कराचीत महाराष्ट्र पंचायत संस्थेचा सदस्य आहे. त्याच्याशी ऑनलाईन गप्पा मारताना तिथल्या लोकांना मराठी शिकवण्याचा विषय निघाला. माझा मुलगा स्वप्नील या उपक्रमाची तांत्रिक जबाबदारी बघतो.

साताऱयातील दिलीप पुराणिक यांचा पुढाकार

पाकिस्तानातील कराची शहरात पिढय़ान्पिढय़ा काही मराठी कुटुंबे राहतात. त्यांनी सण- उत्सव यांच्या माध्यमातून मराठी भाषेशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. यापुढे एक पाऊल टाकत आज ते पहिल्यांदाच मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहेत. त्यासाठी ते साताऱयातील दिलीप पुराणिक यांच्यासोबत तयारी करत आहेत. पुराणिक गेल्या दोन महिन्यांपासून कराचीतील मराठी कुटुंबांना व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मराठी शिकवत आहेत. याचाच भाग म्हणून आज कराचीत डिजिटल माध्यमातून का होईना, पण मायमराठीचा गौरव होणार आहे.

कराचीत 150 पेक्षा जास्त मराठी कुटुंबे आहेत. साधारण 500 ते 600 एवढे लोक राहतात. महाराष्ट्र पंचायत या आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही होळी, गुढीपाडवा, गणेशोत्सव साजरा करतो. माझी आई, मामा, मावशी मराठी आहेत. पण पुढच्या पिढीला मराठी बोलता येत नाही. म्हणूनच दिलीप पुराणिक यांच्या मदतीने मराठी शिकत आहोत. आता आम्हाला आरती, श्लोक म्हणता येतं. हळूहळू आमची मराठी भाषा सुधारत आहे.

 विशाल राजपूत, महाराष्ट्र पंचायत, कराची.

आपली प्रतिक्रिया द्या