रावळपिंडीमध्ये बांगलादेशने 2-0 ने पाकिस्तानचा सुपडा साफ करत ऐतेहासिक मालिका विजय साजरा केला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच बांगलादेशने पाकिस्तानला घरच्या मैदानावर धुळ चारली आहे. मात्र हा लाजिरवाणा पराभव चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
बांगलादेशने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर माजी कर्णधार जावेद मियांदादने संघाच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तो म्हणाला की, हे खूपच वेदनादायक असून आपल्या खेळाचा स्तर इतका खालावला आहे. बांगलादेशला त्यांच्या चांगल्या प्रदर्शनासाठी विजयाचे श्रेय दिले पाहिजे. मात्र ज्या पद्धतीने आपली फलंदाजी ढासाळली आहे, तो भविष्यासाठी एक वाईट संकेत आहे, अशी चिंता जावेद मियांदादने व्यक्त केली. तो पुढे म्हणाला की, मी फक्त खेळाडूंना दोष देणार नाही. मात्र मागच्या दीड वर्षात PCB मध्ये जे काही चालू आहे. तसेच कर्णधार आणि व्यवस्थापनामध्ये झालेल्या बदलामुळे त्याचा परिणाम संघावर झाला आहे, असे म्हणत जावेद मियांदादने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सुद्धा टीका केली.