पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील शाळा बनत आहेत दहशतवादाचे अड्डे; जैश आणि लष्करचा नवा कट उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांनी आता आपला मोर्चा शाळांकडे वळवला आहे. धार्मिक मेळावे, रॅली आणि दहशतवादी शिबिरांनंतर या संघटनांनी आता थेट शिक्षण क्षेत्राचा वापर करून दहशतवाद्यांची नवी फौज तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इस्लाम आणि काश्मीरमधील जिहादच्या नावाखाली विद्यार्थ्यांची भरती केली जात असून, यासाठी पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये उघडपणे जाहिराती आणि पोस्टर्स लावली जात आहेत.

या दहशतवादी संघटना प्रामुख्याने सात ते तेरा वर्षे वयोगटातील मुलांना लक्ष्य करत असून, पालकांना त्यांच्या शाळांमध्ये पाल्यांना दाखल करण्याचे आवाहन केले जात आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांना आकर्षित करण्यासाठी मोफत शिक्षण, जेवण आणि मासिक भत्त्याचे आमिष दाखवले जात आहे. शिक्षणाच्या नावाखाली या ठिकाणी इस्लामी तत्त्वांवर आधारित युद्ध प्रशिक्षणाचे धडे दिले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दहशतवादी संघटनांचे सदस्य सरकारी आणि खाजगी शाळांना भेटी देऊन प्रक्षोभक जिहादी भाषणे देत आहेत. याव्यतिरिक्त, काश्मीरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा आणि नाटके आयोजित केली जात असून, त्यातून मुस्लिमांवरील अत्याचाराच्या खोट्या कहाण्या पसरवल्या जात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून शाळांमध्ये ही दहशतवादी मानसिकता रुजवण्याचे कारस्थान आखण्यात आले होते. यामध्ये जैश-ए-मोहम्मद ही संघटना सर्वाधिक सक्रिय असून ती सरकारी आणि निमसरकारी शाळांमध्येही आपला प्रभाव वाढवत आहे, तर लष्कर-ए-तोयबाचे कार्य केवळ त्यांच्या संलग्न संस्थांपुरते मर्यादित आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक जनतेमध्ये काश्मीर जिहादबद्दल वाढती निराशा आणि दहशतवादी शिबिरांविरुद्ध होणारा निषेध पाहता, पाकिस्तानी लष्कर आणि सरकारच्या पाठिंब्याने या हालचालींना वेग आला आहे.

2010 मध्ये मुख्य प्रवाहात सामील झालेल्या एका माजी दहशतवाद्याने दिलेल्या माहितीनुसार, या शाळांमध्ये एकदा मुलाने प्रवेश घेतला की पालकांनाही तिथे जाण्याची परवानगी नसते. तेथे प्रत्येक विद्यार्थ्याला दरवर्षी जिहाद प्रशिक्षणात सहभागी होणे बंधनकारक असते. चांगल्या भविष्याच्या आशेने गरीब कुटुंबे आपली मुले या संघटनांच्या हवाली करतात, परंतु शेवटी ही मुले केवळ हिंसेचे साधन बनतात.