पाकिस्तानची अणुहल्ल्याची धमकी, आज बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन

हिंदुस्थानने सर्व बाजूंनी काsंडी केल्याने पाकिस्तानातील नेते, उच्चाधिकारी यांचा संयम सुटत चालला आहे. रशियातील पाकिस्तानच्या राजदूताने हिंदुस्थानला अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. रशियातील वृत्तवाहिनी ‘आरटी’ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी ही धमकी दिली असून हिंदुस्थान लवकरच पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करणार असल्याची माहिती लीक झालेल्या महत्त्वाच्या दस्तावेजांमधून मिळाल्याचा त्यांनी दावा केला आहे.

जर हिंदुस्थानने पाकिस्तानवर हल्ला केला तर इस्लामाबाद हिंदुस्थानला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल मग तो अणुहल्ला असला तरी, असे मुहम्मद खालिद जमाली यांनी म्हटले आहे. हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बेजबाबदार वक्तव्ये आम्हाला ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे आम्हालाही प्रत्युत्तर देण्याविषयी विचार करण्यास भाग पाडले जात आहे. हिंदुस्थानच्या पाकिस्तानच्या काही भागांवर हल्ला करणार असून हे होऊनच राहाणार असे आम्हाला वाटते. त्यामुळे इस्लामाबादच हिंदुस्थानला प्रत्युत्तर देईल, असे जमाली यांनी म्हटले आहे.

फवाद खान, आतिफ असलम यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक

पाकिस्तानातील सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध अभिनेते फवाद खान, आतिफ अस्लम तसेच ‘सनम तेरी कसम’फेम मावरा होकेन आणि प्रसिद्ध सूफी गायिका आबिदा परवीन यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हिंदुस्थानात ब्लॉक करण्यात आले आहे. यापूर्वी माहिरा खान, हानिया आमिर, सनम सईद, अली जाफर यांच्यासह 13 सिने कलाकारांची सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्यात आली आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवरही हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे.

पाकिस्तानला पाठिंबा; आसाममध्ये 39 जणांना अटक

पहलगाम हल्ल्यानंतर आसाममध्ये पाकिस्तानला पाठिंबा दिल्याबद्दल आतापर्यंत 39 जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी देशद्रोह्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहिल, कुणालाही सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे.

पाकिस्तानकडून सैन्याच्या तयारीवर पाच हजार कोटींचा खर्च

हिंदुस्थानच्या कारवाईमुळे पाकिस्तानची अक्षरशः झोप उडाली असून 2 मेपर्यंत पाकिस्तानी सैन्याने जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. या खर्चात तुकाa आणि चीनकडून अलीकडेच खरेदी केलेल्या युद्धजन्य उपकरणांचा समावेश नाही. पाकिस्तान सैन्यावर दिवसाला अंदाजे 45 कोटी रुपये खर्च करते. यात सर्वाधिक खर्च लढाऊ विमानांची उड्डाणे आणि सैनिकांच्या सराव तसेच हालचालींवर झाला. पाकिस्तानने सैन्याच्या हवाई तळांवर 80 लढाऊ विमाने तैनात केली असून अनेक हवाई पट्टय़ा पुन्हा कार्यान्वित केल्या आहेत.

जवानाचा पाकिस्तानी पत्नीबद्दल माहिती दिल्याचा दावा

पाकिस्तानी पत्नीची माहिती लपवल्याबद्दल नोकरीवरून काढून टाकण्यात आलेले सीआरपीएफ जवान मुनीर अहमद यांनी आपल्याला न्याय देण्याची मागणी हिंदुस्थान सरकारकडे केली आहे. मी माझ्या पत्नीला येथे ठेवले होते आणि त्याबद्दल विभागाला माहिती दिली होती, असा दावा त्यांनी केला आहे. माझ्याकडे याबाबत पुरावे असून मी कागदपत्रेही सादर केली, परंतु मला अचानक नोकरीवरून काढले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांकडे अपील करणार असल्याचे मुनीर अहमद यांनी म्हटले आहे.

– पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी उद्या सायंकाळी 5 वाजता इस्लामाबादमध्ये संसदेचे आपत्कालीन अधिवेशन बोलावले आहे. शनिवारी मध्यरात्री हा आदेश जारी करण्यात आला. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हिंदुस्थानकडून प्रतिहल्ला होण्याचा धसका घेतला असून त्याअनुषंगाने अधिवेशनात चर्चा होऊ शकते.