Israel Iran War – पाकिस्तान मध्यस्थी करणार; व्हाईट हाऊसने वाजवली होती नकारघंटा, ट्रम्प यांनी केले स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जगाने निश्वास सोडला असून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरू झाली आहे. तसेच जागतिक शेअर बाजारासह सोनेचांदीच्या किमतीत तेजी दिसत आहे. असे असेल तरी अमेरिकेची भूमिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे संभ्रम पसरवणारे ट्वीट यामुळे नेमके युद्ध शमणार की तीव्रता वाढणार, अशी चर्चा होत आहे.

या युद्धात पाकिस्तानच्या मध्यस्तीचा विषय येताच मंगळवारी व्हाईट हाऊसच्या प्रतिनिधींनी जोपर्यंत आम्ही अधिकृत माहिती देत नाही, तोपर्यंत कोणत्याही अटीकळीवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट करत पाकिस्तानच्या मध्यस्तीचा मुद्दा फेटाळून लावला होता. आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मध्यस्तीच्या ट्विट रिट्विट करत ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. या सर्वात अमेरिका आणि ट्रम्प यांच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रम निर्माण होत आहे.

शाहबाज शरीफ यांनी अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध संपवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला.याबाबत त्यांनी X वरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिका आणि इराण यांच्यात अर्थपूर्ण आणि फलदायी चर्चा घडवून आणण्यासाठी पाकिस्तान तयार आहे. असे करणे आमच्यासाठी सन्मानाचे असेल. मध्य पूर्व आणि पश्चिम आशियातील संकट सोडवण्यात पाकिस्तानच्या संभाव्य भूमिकेवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नवीन अटकळांना वाव मिळाला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांची एक पोस्ट पुन्हा शेअर केली. X वरील या पोस्टमध्ये, शाहबाज यांनी युद्ध संपवण्यासाठी इराण आणि अमेरिका यांच्यात बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला.

X वरील आपल्या पोस्टमध्ये शहबाज यांनी लिहिले, “मध्यपूर्वेतील सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी संवादाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे पाकिस्तान स्वागत करतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो. या प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता आणि स्थिरतेच्या हितासाठी, अमेरिका आणि इराणच्या संमतीच्या अधीन राहून, सुरू असलेल्या संघर्षावर सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी अर्थपूर्ण आणि निर्णायक संवादाचे आयोजन करण्यास पाकिस्तान तयार आहे आणि तो आमच्यासाठी सन्मानाचा विषय आहे, असे शरीफ यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

पाकिस्तानचे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मध्यस्थी करण्याचा त्यांनी प्रस्ताव दिला आहे. मात्र, ट्रम्प आणि व्हाईट हाऊसच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रम वाढला आहे. मात्र, हे युद्ध संपण्याचे संकेत असल्याने जगाला दिलासा मिळत आहे.