पाकिस्तानचा सीमाभागात गोळीबार, एक जवान शहीद

337

पाकिस्तानने जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करत उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात हिंदुस्थानी लष्कराचा एक जवान शहीद झाला असून एका अधिकाऱ्यासह दोन जण जखमी झाले आहेत. नाईक अनीश थॉमस असे त्या जवानाचे नाव आहे.

पाकिस्तानने मंगळवारी रात्री राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार केला. रात्री अचानक झालेल्या या हल्ल्याला हिंदुस्थानी जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात हिंदुस्थानचे तीन जवान जखमी झाले. त्यातील एका जवानाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर दोन जवानांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जम्मू-कश्मीरात गेल्या सहा महिन्यांत 138 अतिरेकी ठार

जम्मू-कश्मीरात सुरक्षा दलांकडून यंदाच्या मार्च आणि ऑगस्ट महिन्यात जवळपास 138 अतिरेकी विविध चकमकीत मारले गेल्याची माहिती केंद्रिय गृहराज्यमंत्री जी. कृष्णन रेड्डी यांनी लोकसभेत मंगळवारी दिली.दशतवाद ठेचून काढण्यासाठी सशस्त्र सैन्य दलांनी शून्य सहिष्णूता धोरण स्वीकारले असून अतिरेक्यांच्या खात्मा करण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जात असल्याचेही रेड्डी यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचा परिणाम म्हणून 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 काळात जम्मू आणि कश्मीरमध्ये 138 अतिरेक्यांचा खात्मा झाला आहे. या सहा महिन्याच्या काळात आपले 50 सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद विरोधी चकमक आणि सीमेपलिकडून सीजफायरचे उल्लंघन करीत झालेल्या गोळीबारात शहीद झाल्याचे त्यांनी संसदेत लेखी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ऑगस्ट 2019 ते जुलै 2020 दरम्यान सीमेपलिकडून 176 घुसखोरीचे प्रयत्न झाले असून त्यातील 111 यशस्वी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

निमलष्करी दलाच्या 4,132 जणांचा मृत्यू
जुलै 2017 ते 2019 या काळात डय़ूटी बजावताना निमलष्करी दलाचे एकूण 4,132 जवानांचा मृत्यू झाल्याचे लोकसभेत सरकारने सांगितले.  या मृत्यूंमध्ये गॅजेटेड ऑफिसर आणि त्यांचे सहकारी तसेच इतर श्रेणीच्या अधिकाऱयांचा समाकेश आहे. सर्वाधिक मृत्यू झालेल्या मध्ये सीआरपीएफ (1,597), त्यानंतर बीएसएफ (725), सीआयएसएफ (671), आयटीबीपी (429), एसएसबी (329), आसाम रायफल (381) समावेश असल्याचे एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना लोकसभेत सरकारने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या