पाकिस्तानातही चर्चा नरेंद्र मोदींचीच!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक निकालांची उत्सुकता देशभरात आहे, तेवढीच उत्सुकता पाकिस्तानमध्येही दिसून येत आहे. पाकिस्तानातील जवळपास सर्व प्रसारमाध्यमांमध्ये नरेंद्र मोदी यांचीच चर्चा असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानातील सर्व प्रसारमाध्यमांनी सत्तेत पुन्हा नरेंद्र मोदीच येणार असे भाकीत वर्तवले आहे. त्याचबरोबर मोदी पुन्हा सत्तेत आल्यास हिंदुस्थानचे पाकिस्तानबरोबचे संबंध सुधारतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाच्या दिशने वाटचाल करत आहेत. हिंदू राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर एनडीएला बहुमत मिळेल असे पाकिस्तानातील प्रमुख वर्तमानपत्र ‘डॉन’ने म्हटले आहे. तसेच मोदी पुन्हा सत्तेत आल्यास पाकिस्तानबाबतच्या त्यांच्या धोरणात बदल होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध तणावाचे राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. मोदी पुन्हा सत्तेत आल्यास दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची अपेक्षा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी व्यक्त केली होती. मात्र, त्याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी हे वाजपेयी नाहीत. त्यामुळे दोघांची तुलना करणे अयोग्य ठरेल. चर्चेऐवजी ठोस कारवाई करून समस्या सोडवण्याचे मोदींचे धोरण आहे असे एका लेखात जाहिद हुसैन यांनी लिहिले आहे.

कश्मीर मुद्द्यावरही पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होत आहे. मोदी यांनी 370 कलम आणि 35 ए हटवण्यासाठी प्रयत्न केल्यास जम्मू कश्मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ने व्यक्त केली आहे. कश्मीरमधील घटनांचे पडसाद दोन्ही देशाच्या संबंधावर होतील असेही लेखात म्हटले आहे. मोदी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तानात परराष्ट्र मंत्रालय आणि इतर मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आगामी काळासाठी रणनीती ठरवण्याबाबत काम सुरू केले आहे. मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ पाकिस्तानविरोधातील धोरणे राबवण्याची शक्यता असल्याने आगामी रणनीती ठरवण्यात येत आहे. टाइम्समध्ये मोदींचा उल्लेख ‘डिवायजर इन चिफ’ असा करण्यात आला होता. त्याचा दाखल देत मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात हिंदुस्थानात लोकशाही मूल्ये आणि धर्मनिरपेक्षतावाद धोक्यात येईल असे मत व्यक्त करत धार्मिक हिंसाचार वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, दुसऱ्या कार्यकाळात मोदी पाकिस्तानबाबतची धोरणे बदलून चर्चेला सुरुवात करतील आणि मैत्रीचा हात पुढे करतील अशी अपेक्षाही काही प्रसारमाध्यामांनी व्यक्त केली आहे. देशातील लोकसभा निवडणुकांमुळे पाकिस्तानातही मोदींची चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे.