
पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेला असून तीन दिवसांत चौथा तडाखा बसला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज 3.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला. या घटनेत कुठेही नुकसान झाले नसले तरी वारंवार जमिनीच्या पोटात धाडधाड होत असल्याने गावकऱ्यांच्या छातीत मात्र धडधड होत असून भय इथले संपत नाही, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
वर्षभरापासून पालघर जिह्यात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. जुलै महिन्यात डहाणूच्या नागझरी येथील वसावला पाडय़ात घर कोसळून रिषा मेघवाले (55) यांचा मृत्यू झाला होता. दैव बलवत्तर म्हणून या घटनेतून त्याची पत्नी बचावली होती. त्यानंतर शांत झालेल्या भूकंपाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून 11 सप्टेंबरपासून अधून मधून धक्के बसत आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून डहाणू आणि तलासरी तालुक्यात धक्के बसले. शुक्रवारी एकाच दिवशी अनुक्रमे 3.5, 3.2 व 2.6 रिश्टर असे तीन झटके बसले. दुसऱया दिवशी शनिवारी 3.2 तर आज 12.47 वाजता 3.4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू धुंदलवाडीपासून 10 कि.मी. खोलवर आहे. भूकंपाची तीव्रता कमी असली तरी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे डहाणू, तलासरीकरांची झोप उडाली आहे.
रात्रीची झोप उडाली
गेल्या वर्षभरापासून तीसहून अधिक वेळा डहाणू, पालघर, तलासरी या विभागात भूकंपाचे धक्के बसत आहेत. 1 फेब्रुवारी रोजी डहाणू तालुक्यात एकापाठोपाठ एक भूकंपाचे पाच धक्के बसले होते. त्यात धुंदलवाडीतील वैभवी भुयाळ ही चिमुरडी जिवाच्या आकांताने घराबाहेर पळताना मोठय़ा दगडावर आदळून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर वसावला पाड्यात जुलै महिन्यात रिषा मेघवाले (55) यांचा दुसरा बळी गेला. भूकंपाच्या तडाख्यात झोपडी कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. भूकंपाच्या धक्क्यांची ही मालिका संपत नसल्याने डहाणू, तलासरीतील गावपाड्यांमध्ये अक्षरशः दहशत पसरली असून गावकरी रात्र रात्रभर जागून काढत आहेत.
एनडीआरएफची टीम रवाना
जुलै महिन्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये भूकंपाचे तडाखे बसू लागले आहेत. त्यामुळे 21 जणांची एनडीआरएफची टीम डहाणूच्या धुंदलवाडीत पोहोचली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
महिनाभरातील आजवरचे झटके
दिनांक वेळ तीव्रता 11/9/2019 02.22 3.6
12/9/2019 01.52 0.5
14/9/2019 09.50 6.0
16/9/2019 08.00 4.3
17/9/2019 09.38 4.5
19/9/2019 12.36 6.1
19/9/2019 09.20 3.2
20/9/2019 04.32 3.5
21/9/2019 10.20 3.2
22/9/2019 12.47 3.4
इस्रोच्या पाच अभियंत्यांवर पुरावा नष्ट केल्याचे आरोपपत्र


























































