पालघरमधील शेतकऱ्यांना रिलायन्सकडून वाढीव रक्कम देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
palghar-farmers

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालघरमधील शेतकऱयांना येत्या पंधरा दिवसांत रिलायन्स कंपनीकडून नुकसानभरपाईची वाढीव रक्कम मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्यामुळे पालघरमधून निघालेला हजारो शेतकऱयांचा लाँग मार्च दहिसर चेकनाक्यावर विसर्जित करण्यात आला. मुंबईत लागू केलेल्या जमावबंदी आदेशामुळे या शेतकऱयांना मुंबईच्या वेशीवरच रोखण्यात आले होते.

रिलायन्स कंपनीचा नागोठणे ते गुजरातमधील दहेज असा जमिनीखालून गॅस पाइपलाइन टाकण्यात येणार आहेत. ही पाइपपाइन वाडा, विक्रमगड, तलासरी, डहाणूमधील शेतकऱयांच्या शेतातून जाते. या प्रकल्पग्रस्त शेतकऱयांना पैसे देताना वाडय़ातील शेतकऱयांना प्रतिगुंठा चार ते पाच लाख रुपये दर दिला. तर विक्रमगड, तलासरी, पालघर आदी भागातील आदिवासी शेतकऱयांना प्रत्येक गुंठय़ामागे किमान 175 ते 9 हजार 600 रुपये असा दर दिला. त्यामुळे ही रक्कम वाढवून देण्यासाठी दोन हजार शेतकऱयांनी रिलायन्स प्रकल्पपीडित आदिवासी शेतकरी समितीच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढला होता.

पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी आणि वाडा तालुक्यातील रिलायन्स गॅस लाईन प्रकल्पपीडित हजारो आदिवासी शेतकऱयांचा मोर्चा आज मुंबई पोलिसांनी दहिसर जकात नाक्यावर अडवला. या मोर्चाला शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. महानगरपालिकेच्या आर/उत्तर विभागाच्या वतीने फिरते शौचालय, मुबलक पाणी, पिण्याचे स्वच्छ पाणी, न्याहारी, चहा, कॉफी तसेच महापालिकेच्या प्रांगणात मोर्चेकऱयांना विश्रांती आणि वैद्यकीय मदत देण्यात आली.