
पालघर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीकरिता 57 जागासाठी 364 इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आठ पंचायत समितींच्या 114 जागांसाठी 667 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले. उद्या 24 डिसेंबर रोजी या सर्व नामनिर्देशन पत्राची छाननी असून 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार शिल्लक राहतील त्याचे चित्र स्पष्ट होईल.
पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून 7 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. एकूण 57 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या आज अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली. पालघर-88, विक्रमगड-78, जव्हार-20, वाडा-40, मोखाडा-15 डहाणू-71, तलासरी-29, वसई-23 असे एकूण 364 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले. पंचायत समितीसाठीही आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पालघर-184,विक्रमगड-91, जव्हार-43, वाडा-92, मोखाडा-38, डहाणू-115, तलासरी-57, वसई-47 असे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत.

























































