
‘एक दो.. एक दो.. मुरबे बंदर फेक दो.., एकच जिद्द.. बंदर रद्द’ अशा गगनभेदी घोषणांनी आज पालघर जिल्हा दणाणून गेला. निमित्त होते पर्यावरणीय जनसुनावणीचे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात ही सुनावणी सुरू झाली खरी पण जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो मच्छीमार भूमिपुत्रांनी या बंदराला कडाडून विरोध केला. या बंदरामुळे मच्छीमार डबघाईला येणार असून हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होणार आहेत. प्राण गेला तरी बेहत्तर पण मुरबे बंदर लाद देणार नाही, अशी शपथच यावेळी घेण्यात आली.
मुरबे बंदराच्या पर्यावरणीय परवानगीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आज पालघर जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी मुरबे, नांदगाव, कुंभवली, नांदगाव, आलेवाडी, सातपाटी यांसह किनारपट्टीवरील ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महिलाही मोठ्या प्रमाणावर आपला विरोध व्यक्त करण्यासाठी आल्या होत्या.
शिवसेना, मनसे पदाधिकारी उपस्थित शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते उत्तम पिंपळे जिल्हाप्रमुख अजय ठाकूर, अनुप पाटील, मनसेचे समीर मोरे, धीरज गावड यांच्यासह मच्छीमार नेते रामकृष्ण तांडेल, जयवंत तांडेल, मानेंद्र आरेकर, प्रमोद आरेकर, मिलिंद राऊत, संजय कोळी, जयकुमार भाय, भूषण भोईर, विनोद पाटील, मोनालिसा तरे, विनीत पाटील, मिल्टन डिसोजा, स्वप्निल तरे, वैभव भोईर, नारायण तांडेल, दर्शना पागधारे, यामिनी नाईक आदी स्थानिक पदाधिकारी उपस्थितीत होते.
– पर्यावरणविषयक अहवालाचे वाचन प्रशासनाने सुरू करताच ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देत विरोध दर्शवला.
– मुरबे बंदरासाठी तयार केलेला पर्यावरणीय मूल्यांकन अहवाल हा खोटा असल्याच्या तक्रारी मच्छीमारांनी तसेच ग्रामस्थांनी केल्या