200 कोटींचा पाली-खोपोली मार्ग तीन वर्षांतच उखडला; खड्ड्यांमुळे चाळण, अपघातही वाढले

२०० कोटी रुपये खर्चुन रुंदीकरण केलेला पाली-खोपोली महामार्ग तीन वर्षांतच खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागतो. पावलापावलावर अर्धा ते एक फूट खोल पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची हाडे अक्षरशः खिळखिळी होत आहेत. रस्ता खड्ड्यात गेल्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतच आहे शिवाय अपघातही वाढले आहेत.

वाकण-पाली-खोपोली हा राष्ट्रीय महामार्ग एकूण ३९ किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याचे काम २०१६ पासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होते ते गेल्या तीन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. या कामासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र मुसळधार पावसाने निकृष्ट कामाची पोलखोल केली. महामार्गावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची प्रत्यक्षात खोली मोजली असता किरकोळ खड्डे वगळता एक फूट खोलीचे ६ तर अर्धा फूट खोलीचे २० जीवघेणे खड्डे या मार्गावर पडले आहेत.

पावसाचे कारण देत वेळ मारून नेली

खड्डे भरण्यासाठी स्थानिकांनी गेल्या दोन महिन्यांत दोन आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र तरीही रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील पाली मिनिडोअर स्थानक, देवन्हावे, मिरकुटवाडी, इमॅजिका, उंबरे, गोंदाव फाटा, दुधानेवाडी, वऱ्हाड, रासळ, पाली, बलाप व राबगाव या गावांजवळ खड्डेच खड्डे पडलेले आहेत. या समस्येबाबत एमएसआरडीचे अधिकारी सारंग इमानदार यांच्याशी संपर्क साधला असता पावसाचे कारण पुढे करत त्यांनी वेळ मारून नेली.