
पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील सर्वाधिक गजबजलेल्या मार्गांपैकी एक असलेला पाचगणी–महाबळेश्वर रस्ता गेल्या सहा महिन्यांपासून उखडून ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. उन्हाळी पर्यटन हंगाम तोंडावर आला असताना रस्त्याची दुरवस्था, रखडलेली कामे आणि प्रशासनाची संथगती, यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, स्थानिक स्टॉलधारक आणि लहान व्यावसायिक यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
पाचगणी–महाबळेश्वर मार्गावर अनेक ठिकाणी डांबरी थर पूर्णपणे उखडून टाकण्यात आला आहे. खड्डे, मुरुमाचे ढीग आणि उडणारी धूळ यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धुळीचा फटका केवळ प्रवाशांनाच नव्हे, तर रस्त्यालगतच्या वस्तीला आणि दुकानदारांनाही बसत आहे. धुळीमुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि ऍलर्जीच्या तक्रारी वाढत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक व्यावसायिक संघटनांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करून निश्चित मुदतीत पूर्ण करण्याची मागणी केली आहे. कामकाजात पारदर्शकता, प्रगती अहवाल सार्वजनिक करणे आणि धूळ नियंत्रणासाठी तात्पुरती उपाययोजना जसे की नियमित पाण्याची फवारणी, सुरक्षित पर्यायी मार्ग आणि स्पष्ट सूचनाफलक राबवावेत, अशी मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनानेही परिस्थितीची दखल घेत तांत्रिक अडचणी दूर करून कामाला गती देण्याचे संकेत दिल्याची माहिती समोर येत असली, तरी प्रत्यक्षात यंत्रणा कितपत वेगाने हालचाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पर्यावरणावरही परिणाम
पर्यावरणीय परिणामही तितकेच गंभीर आहेत. परिसरातील घनदाट हिरवाईवर धुळीचा जाड थर साचल्याने पानांची प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया बाधित होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱया नैसर्गिक सौंदर्याला यामुळे धक्का बसला आहे. पर्यटकांची संख्या घटल्याने स्थानिक व्यवसायाचे चक्र मंदावले आहे. अनेक हॉटेलमध्ये बुकिंग रद्द होत असल्याचे व्यावसायिक सांगतात. रस्त्याचे काम रखडण्यामागे प्रशासकीय गुंतागुंत आणि ठेकेदारांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. मूळ ठेका दिल्यानंतर कामाची जबाबदारी पुढे दोन स्वतंत्र ठेकेदारांकडे वळवण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. संबंधित यंत्रणांनी स्पष्ट भूमिका न घेतल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि संताप वाढला आहे.




























































