पंढरपूरात 129 दिव्यांगाना कृत्रिम अवयवाचे वितरण

378

भारत विकास परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग सहाय्यता शिबिरात 129 दिव्यांगाना कृत्रिम हात व पायाचे वितरण करण्यात आले. भारत विकास परिषदेच्या पंढरपूर शाखेच्या वतीने मागील महिन्यात येथे शिबिर घेऊन दिव्यांग व्यक्तिची तपासणी करण्यात आली व त्यांच्यासाठी कृत्रिम हात व पायांची मापे घेण्यात आली होती. जवळपास 189 जणांनी यासाठी नोंदणी केली होती तर 129 जण या कृत्रिम हात व पायांसाठी पात्र ठरले होते. पुणे येथून हे कृत्रिम अवयव तयार करून येथे आणण्यात आले होते.

पंढरपूर येथील डॉ. काणे यांच्या गायत्री हॉस्पिटलमध्ये कृत्रिम अवयव या दिव्यांगाना बसवून देण्यात आले. काही गरजूंना कॅलिपर्सचे ही वितरण करण्यात आले. आयोजित कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षस्थान आमदार भारत भालके यांनी भुषविले.

दानशूर व्यक्तिंच्या सहकार्याने यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम भारत विकास परिषद राबविणार असल्याचे डॉ. सुरेंद्र काणे यांनी सांगितले. यावेळी भारत विकास परिषदेच्या नव भारत फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ताजी चितळे, श्रीकांत कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करून दिव्यांगासाठी संस्था सर्वतोपरि सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरमने झाली. शिल्पा चौंडावर यांनी स्वागत गीत गायले. प्रा. मेधा दाते यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयी माहिती दिली. प्रास्ताविक डॉ. सुरेन्द्र काणे यांनी केले. यावेळी डॉ.वर्षा काणे, महावीर गांधी, विलास त्यागी सतीश झांजड, डॉ. पंकज गायकवाड उपस्थित होते. मंदार केसकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या उपक्रमासाठी सेवाप्रमुख डॉ. अनिल पवार, अजित कुलकर्णी, सुनील उंबरे ,विश्‍वास पाटील, विनोद सुरवसे,जगदीश टाक, रेखा टाक, मंदार लोहकरे , सचिन बेणारे, मुकुंद कर्वे यांनी परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या