
भाजपच्या वतीने आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर ‘मंदिर उघडा’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींनी सहभाग न घेतल्याने या आंदोलनाचा पुरता फज्जा उडाला. काही टवाळखोर कार्यकर्त्यांनी पायात चपला व हातात भाजपचे झेंडे घेऊन संत नामदेव पायरीवर धुडगूस घातला.
महाराष्ट्रातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करावीत, यासाठी भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. मात्र, वारकरी संप्रदायातील कोणीच महाराज पंढरपुरातील आंदोलनाकडे फिरकले नाहीत. काही टवाळखोरांनी पायात चपला घालून संत नामदेव पायरीवरून मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, मोहोळमध्ये शंखनाद आंदोलन करण्यात आले.
अण्णा हजारे फिरकलेच नाहीत
नगर – मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपने केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणारे व त्यात सहभागी होण्याची घोषणा करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे मात्र आज आंदोलनात दिसलेच नाहीत. राळेगणसिद्धी गावात असे आंदोलनही झाले नाही. तर, दुसरीकडे नगर शहर भाजपने केलेल्या आंदोलनाकडे भाजपच्या नगरसेवकांनी पाठ फिरविली.



























































