माझा ‘बंगला’ ताब्यात घ्या, आमदार भारत भालके झाले भावुक

1957

कोरोनाच्या उपाययोजनांसाठी गरज पडल्यास माझा बंगला ताब्यात घ्या पण कोणाचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, अशी भावुक सूचना पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडली. पंढरपूरचे मूळ रहिवासी असलेल्या सुमारे सात हजार नागरिकांनी पंढरपूर शहर आणि तालुक्यात परत येण्यासाठी परवानगी घेतली आहे. सात हजार पैकी चार हजार नागरिक दाखल झाले आहेत. या सर्व नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी मठ, धर्मशाळा, विद्यालय, शाळा आदी वास्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

बाहेरुन नागरिक आला की त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला थेट घरी न जाऊ देता त्यांना या विलगीकरण केंद्रात ठेवले जात आहे. याच विलगिकरणातील मुंबईहून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

पंढरपूर शहरात दोन आणि तालुक्यात चार असे एकूण सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दक्षता म्हणून प्रशासनाने ज्या भागात हे रुग्ण वास्तव्याला होते तो परिसर सील केला आहे.  कामधंद्यानिमित्त बाहेर गावी राहणारे आणखी तीन हजार लोक पंढरपूर मध्ये दाखल होणे बाकी आहे. त्यांच्यासाठी प्रशासन राहण्याची व्यवस्था करीत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन नियोजनाचा आढावा घेतला. या बैठकीत भालकेंनी यमाई तलाव येथील राहता बंगला कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वापरावा अशी सूचना केली. बाहेरुन आलेल्या नागरिकांना अथवा वैद्यकीय उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या निवासी व्यवस्थेसाठी हा बंगला वापरावा माझी काहीही हरकत नाही.

बंगल्यामध्ये ज्या काही सोयीसुविधा लागतील त्या मी माझ्या स्व खर्चाने करुन देतो. पण लोकांचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या अशी भावुक सूचना आ.भालके यांनी बैठकीत व्यक्त केली. या बैठकीस प्रांताधिकारी सचिन ढोले, डीवायएसपी डॉ सागर कवडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.

सोलापूरनंतर आता पंढरपुरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच बाहेर गावाहून आलेल्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला दुमजली बंगला क्वारंटाईसाठी देण्यात असल्याचे जाहीर केले आहे. तसे त्यांनी प्रशासनाला पत्र देखील दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एका आमदाराने लोकांसाठी आपला रहाता बंगला खाली करून दिला आहे. आमदार भालके यांच्या सामाजिक दातृत्वाचे स्वागत केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या