श्री विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची झीज, संवर्धनासाठी केले जाणार वज्रलेपन

367

भाविकांच्या पदस्पर्शाने होणारी श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची झिज रोखण्यासाठी देवाच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. 30 जून पूर्वी वज्रलेप करुन मूर्तीचे संवर्धन करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली आहे.

श्री विठ्ठल मूर्तीची झीज रोखण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाच्या निर्देशानुसार देवाच्या मूर्तीवर होणारे महाभिषेक आठ वर्षांपूर्वीच बंद करण्यात आले आहेत. तथापि पंढरपूर मध्ये देवाच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची व्यवस्था असल्याने सतत हात लावल्याने देवाच्या पायाची झीज होत असते. यासाठी दर पाच वर्षांनी एकदा देवाच्या मूर्तीवर वज्रलेप नावाचे रासायनिक लेपन केले जाते.

मूर्तीचा इतिहास पहिला तर सदर मूर्ती ही बाराव्या शतका पूर्वीची असल्याचे दाखले मिळतात. वालुकाश्म प्रकारच्या दगडा मधील ही मूर्ती आहे. श्री रुक्मिणीमातेची मूर्ती नेपाळमधील गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या गुळगुळीत पाषाणापासून बनवण्यात आलेली असल्याचे सांगितले जाते. श्रीविठ्ठलाची मूर्ती काहीशी खडबडीत तर श्री रुक्मिणी मातेची मूर्ती अतिशय रेखीव अशी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीस पूर्वी दिवसातून अनेक वेळा महापूजेच्या निमित्ताने दही, दूध, मध, साखर वापरून अभिषेक केला जात असे. दिवसातून अनेक वेळा होणाऱ्या अशा महापूजा मुळे दोन्ही मूर्तींची वेगाने झीज होत होती. हे लक्षात घेऊन सुमारे आठ वर्षापूर्वी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांकडून केल्या जाणाऱ्या महापूजा पूर्ण बंद केल्या आहेत. तेव्हापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीची  फक्त पहाटेची नित्यपूजा मंदिर समितीच्या माध्यमातून केली जाते.

यापूर्वी 1988, 2005 आणि 2012 मध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वज्रलेप प्रक्रिया करण्यात आली होती.  2012 नंतर मात्र वज्रलेप प्रक्रिया झालेली नव्हती. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासंदर्भातील ठराव करून औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना पंढरपूरला बोलवून त्यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची तसेच संपूर्ण मंदिराची पाहणी करून घेतली होती. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी वज्रलेप प्रक्रिया करण्याविषयी अहवाल दिल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मार्च 2020 मध्ये विधी व न्याय विभागाकडे रासायनिक लेपन प्रक्रिया करून घेण्याविषयी परवानगी मागितली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 17 मार्चपासून भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे शासनाकडून परवानगी मिळाली तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंदिर भाविकांसाठी सुरू होण्याच्या आधीच वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंदिर समितीने शासनाकडे पाठपुरावा चालू ठेवला होता. मंदिर समितीच्या मागणीची विधी व न्याय विभागाने दखल घेऊन  प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाऊन संपण्यापूर्वी लेपन करुन घेण्याचा समितीचा मानस असल्याचे जोशी यांनी ‘दै. सामना’शी बोलताना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या