Pandharpur Wari : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी! रिंगण सोहळ्यात घडली दुर्दैवी घटना, बंगालच्या फोटोग्राफरचा मृत्यू

संत ज्ञानेश्वर महाराज माउलींच्या पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात एक दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत बंगालच्या छायाचित्रकाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुरंदावडे येथे रिंगण सोहळ्यामध्ये स्वाराचा आणि माउलींचा अश्व धावत असताना स्वाराच्या अश्वाचा मागील उजवा पाय हा माउलींच्या अश्वाच्या लगाममध्ये अडकला आणि धावता धावता माउलींचा अश्व रिंगण पाहण्यासाठी बसलेल्या भाविकांच्या अंगावर पडला. यामध्ये छायाचित्रकार कल्याण चट्टोपाध्याय यांचा सुद्धा समाेश होता.

कल्याण चट्टोपाध्याय (वय 48) हे हौशी छायाचित्रकार असून देशभरातील विविध भागांमध्ये छायाचित्रण करण्याच्या निमीत्ताने ते फिरत असतं. मिळालेल्या माहितीनुसार, ते पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये टीपण्यासाठी ते पुरंदावडे येथील रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांमवेत सहभागी झाले होते. परंतु याच दरम्यान माउलींचा अश्व त्यांच्या अंगावर पडला आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ उपचारांसाठी अकलुज येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अशी माहिती पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी दिली, तसेच सोलापुर ग्रामीणच्या अकलुज पोलीस ठाण्यामध्ये अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आज माळशिरस मुक्कामी समाज आरतीमध्ये कल्याण चट्टोपाध्याय यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच विमा रक्कम मिळवण्यासाठी आळंदी देवस्थानाकडून प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले आहे.