रॉब हॉलला नमवून पंकज अडवाणी अजिंक्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फॉर्मात असलेल्या हिंदुस्थानच्या पंकज अडवाणीने दहा लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या सीसीआय क्लासिक आमंत्रित बिलियर्ड्स (टाइम फॉरमॅट) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गुरुवारी झालेल्या एकतर्फी अंतिम लढतीत आयबीएसएफ विश्वविजेत्याने इंग्लंडच्या रॉब हॉलवर 2044-507 असा मोठय़ा फरकाने विजय मिळवला. विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बंगळुरूच्या पंकज अडवाणीने कमालीचे सातत्य राखले. गुरुवारी संध्याकाळीही त्याचा प्रत्यय आला. 657 ब्रेक करून 25 जागतिक जेतेपदे नावावर असलेल्या पंकजने त्याच्या स्टाईलमध्ये डावाला सुरुवात केली. त्यानंतर शतकी ब्रेक (131) करताना पहिल्या सत्रामध्ये 841-340 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. हिंदुस्थानच्या नंबर वन अडवाणीने आपल्या खेळात केवळ सातत्य नव्हे तर कमालीची एकाग्रता दाखवली. त्याच्या प्रत्येक फटक्यामध्ये अचूकता होती. परिणामी, प्रतिस्पर्धी हॉल याला त्याचा खेळ खुर्चीवर बसून पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. इंग्लिश खेळाडूने 152 आणि 108 असे ब्रेक करताना थोडा प्रतिकार केला, मात्र पिछाडी भरून काढण्यात त्याला अपयश आले.