मुंडे साहेबांच्या वेळचं राजकारण वेगळं होतं, आताचं वेगळं आहे; पंकजा मुंडे यांचा भाजपला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमेला सुरुवात केली आहे. वेरूळच्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिगांचे दर्शन घेऊन त्यांनी या परिक्रमेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राजकारणात आपला प्रवेश कसा झाला. त्या काळचे राजकारण याबाबत त्यांनी आठवणी सांगितल्या. तसेच यावेळी बोलताना भाजपचा उल्लेख न करता त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

मला जीवनात काही कमी नव्हते. खूप छान आयुष्य होते. त्यावेळी बाबांच्या चेहऱ्यावर उदासी दिसली आणि एका क्षणात राजकारणात प्रवेश केला. ऊन लागायचे नाही चेहऱ्याला, पायाला माती लागायची नाही. मस्त एशो-आरामात जीवन होते. पण बापाच्या चेहऱ्यावर दुःख दिसले. मला माझा पाच वर्षांचा मुलगा म्हणाला, मम्मी बाबा एकटे पडले, तू बाबांसाठी जा. मी शाळा करतो, मी माझे करतो. तू जा, तो असे म्हणाल्यावर मी घराबाहेर पडले. तेव्हापासून आजपर्यंत घराच्या बाहेरच आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

मुंडे साहेब संकटात सापडल्यानंतर त्यांची कन्या असून त्यांची माय झाले. मी मंत्री झाले, त्यानंतर पाच वर्षे स्वचःचा चहा, पोहे देऊन लोकांना बोलावून विकासाचा निधी, ग्रामसभेत योजना, पाणीपुरवठा योजना राबवल्या. शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन केल्या. भ्रष्टाचारमुक्त कारभार केल्यानंतरही अनेकांनी आरोप केले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंडे साहेबांच्या वेळचे राजकारण वेगळे होते, आताचे वेगळे आहे. आता पिढी बदलली. दुसरी-तिसरी पिढी आली. आज सकाळी कोणी एकीकडे, दुपारी दुसरीकडे असते. डोके पागल व्हायची वेळ आहे, अशी टीकाही त्यांनी पक्षाचे नाव न घेता केली.

माझ्या मेळाव्याला ना भजन आहे, ना भोजन आहे तरीही तुम्ही येता, असे म्हणत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. मी दसरा मेळावा घेते. बसायलाही जागा होत नाही. खुर्च्या लावून कार्यक्रम होत नाही. लाखोच्या संख्येने लोक उस्फुर्ततेने येतात. यालाच म्हणतात प्रेम आणि यालाच म्हणतात मुंडेंची परिक्रमा, असेही त्यांनी सांगितले.