तीन जूनला गडावर येऊ शकत नाही; पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट

787

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा 3 जूनला स्मृतीदिन आहे. दरवर्षी गोपीनाथ गडावर स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम होतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट आणि संचारबंदी यामुळे गडावर होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पंकजा मुंडे या दिवशी परळीला येणार नाही. मनावर दगड ठेवून साहेबांच्या दर्शनासाठी आपण 3 जूनला गडावर येऊ शकत नसल्याचे पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केले आहे.

गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक तसंच राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. यामुळे गोपीनाथ गडावर साध्या पद्धतीने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुण्यतिथी कार्यक्रम होणार आहेत. तसेच समर्थकांना दर्शन घेण्यासाठी गर्दी करु नका असे आवाहनही करण्यात आलं आहे. बीड जिल्हाधिकारी यांचे पत्र मिळाले आहे. कोरोना आणि 3 जूनच्या कार्यक्रमासंदर्भात त्यांच्याशी दोन-तीन दिवसांपासून चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली. पण लॉकडाऊनच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केली आहे की, माझा 3 जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा. आपण लोकांना आवाहन केलं असलं तरी मी येणार हे माहित असल्याने लोक मोठ्या संख्येने जमा होतील. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येईल. नियमांचा भंग होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी विनंती केली की, प्रवास रद्द करावा, असे पंकजा मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसेच लोकांची काळजी म्हणून 3 जूनला मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खासदार प्रीतम परळी येथेच आहेत. त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन Live करतील. सर्वांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी करावी. आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया. लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी पोस्टमध्ये केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या