ओबीसी मेळाव्याला जायला पक्षाने परवानगी दिली नाही, पंकजा मुंडेंच्या विधानाने खळबळ

जालना येथील अंबड तालुक्यात शुक्रवारी ओबीसी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपिनाथ पडळकर यांच्यासह विविध पक्षांतील ओबीसी नेते एकाच मंचावर एकत्र आले होते. मात्र, या सगळ्या गर्दीत पंकजा मुंडे मात्र मेळाव्याला गैरहजर होत्या. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. पंकजा यांनी आपल्या गैरहजेरीचं कारण सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मेळाव्याला जायला मला माझ्या पक्षाने परवानगी दिली नाही, असं कारण पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

ओबीसीची जनगणना व्हावी अशी भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती आणि या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केलं होतं याची आठवण करून देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेल्या मार्गावरच मी सध्या काम करत असून माझं राजकारण हे गरिबांसाठी आणि वंचितांसाठी आहे. मी दोन जातींमध्ये कधीच भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. मला ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी आमंत्रणाची गरज नसून मी बहुजनांच्या बाजूने आहे, असं पंकजा म्हणाल्या आहेत.