
चित्रपटाप्रमाणे नागरिक, व्यापारी आणि सराफाला लाखोंचा चुना लावणाऱ्या बंटी-बबलीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पियुष भोसले आणि मंदीप कौर अशी या बंटी बबलीची नावे आहेत. या दोघांनी सुनील बडगुजर या सराफाला स्वस्त दरात सोने देतो, असे आमिष दाखवून 10 लाखांचा गंडा घातला होता. त्यानंतर ते दोघे फरार झाले होते. ते डोंबिवलीतील हाय प्रोफाईल लोढा पलावा सिटीत लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत चार गुन्ह्यांचा पर्दाफाश केला.
पियुषने सुनील बडगुजर यांना स्वस्त दरात सोने देतो असे आमिष दाखवून मंदीप कौरकडे 10 लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर या दोघांनी पोबारा केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पनवेल शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांनी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली. पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी हे दोघेही पनवेलमधून पसार झाले होते.
दरम्यान या बंटी-बबलीच्या मुसक्या आवळण्याच्या विनोद लभडे यांनी पथकाला सूचना दिल्या. या पथकाने तांत्रिक यंत्रणा आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने शोध घेतला असता ते दोघेही डोंबिवलीतील लोढा पलावा फेस 2 मधील अरबानो इमारतीत लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांच्या मदतीने धाड टाकून दोघांना बेड्या ठोकल्या. त्यांची चौकशी केली असता ते दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांनी चार जणांना गंडा घातल्याचे उघड झाले. तसेच पियुषने श्रद्धानंद भोसले, जोएल, प्रमोद भोसले अशा विविध नावांनी फसवणूक केल्याचेही पोलीस तपासात समोर आले.
नऊ पंजाबी तस्करांवर झडप
नवी मुंबई शहरात अमली पदार्थांच्या पुरवठा करण्यासाठी आलेल्या नऊ पंजाबी तस्करांवर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने झडप घातली आहे. त्यांच्याकडून १२० ग्रॅम हेरॉईन हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे ४७ लाख रुपये आहे. अटक आरोपींमध्ये परमजीत सिंग, सुखविंदर सिंग, अरविंद प्रसाद, मनप्रित कुमार, मोनू सिंग, हरप्रित सिंग, गुरूप्रित सिंग भत्ती, सतनाम सिंग, सुखविंदर सुदरसाहिल यांचा समावेश आहे.
सेक्स रॅकेट उद्ध्वस्त
नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नेरुळ येथील सेक्टर 20 मधील एका घरावर छापा मारून ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. दलालांनी जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकललेल्या पाच महिलांची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी राजेशकुमार यादव, दिनेश डांगी, मुकेशकुमार राय यांना अटक केली आहे.