पनवेलमध्ये दोन श्वानांना विष घालून मारले; माथेफिरूविरोधात गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पनवेल तालुक्यातील नेरे गावात विकृतीचा कळस झाला. माथेफिरूने दोन भटक्या श्वानांना विष घालून मारले. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्यात माथेफिरूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अमानुष कृत्य कुणी केले याचा शोध पोलीस घेत आहेत.

नेरे गावाजवळ असलेल्या कृष्णा किराणा दुकानाच्या परिसरात दोन भटक्या श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळले. येथील रहिवासी अनुराधा पासी (३६) यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन माथेफिरूविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच या घटनेतील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.