
स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांनी मोटारसायकल चोरट्यांचे एक रॅकेट उघडकीस आणले असून चार आरोपींना अटक करीत त्यांच्याकडून 16 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
परभणी शहरातील शेख इरफान शेख जलील (रा. नूतननगर हाडको) व शेख जुनेद शेख रियाज (रा. वांगीरोड) या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या एका पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवुन चौकशी केली तेव्हा या दोघांनी राजगोपालाचारी उद्यान, तसेच पूर्णा, ताडकळस, चुडावा, पालम व गंगाखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकली पळविल्याची कबुली दिली. चोरलेल्या पैकी 5 मोटारसायकली कमी किंमतीत विकल्याचे नमुद केले. या दोघा आरोपींकडून या पथकाने 11 मोटारसायकली जप्त केल्या.
पाठोपाठ मोहमद ताहेर चाऊस व सय्यद वली सय्यद (दोघेही रा. पालम) यांना त्या मोटारसायकली विकल्याचे तपासातून पुढे आल्यानंतर पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले. एकूण 16 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.
जुन्या मोटारसायकली खरेदी करतेवेळी ग्राहकांनी सर्व मूळ व पूर्ण कागदपत्रे हस्तगत करावीत, लालसेपोटी कमी किंमतीत मोटरसायकल विक्रीच्या आमिषांना बळू पडू नये, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक आलेवार व बाचेवाड यांनी केले आहे.