परभणीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेला 30 हजार रुपयांचा दंड

28

सामना प्रतिनिधीपरभणी  

त्रुटीच्या सेवेसाठी तथा बेकायदेशीर रक्कम कपातीच्या दोन प्रकरणात परभणीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच बँकेच्या शाखा प्रबंधकाविरुद्ध दंड मंजुर करताना स्टेट बँक ऑफ इंडियाची ‘अनफेअर ट्रेड प्रॅक्टीस’असा जबरदस्त शेरा सुद्धा दिला आहे.

ग्राहकांना कर्ज देताना अथवा अन्य कामासाठी बँकेतील अधिकारी व कर्मचारी अनेक सबबी सांगून छळ केल्याची उदाहरणे अनेकवेळा घडतात. परंतु एकेकाळी बँक ऑफ इंडियाचे बँक अधिकारी असलेल्या व निवृत्त असलेल्या माजी सैनिक सरवर खान जाफर खान पठाण व त्यांची पत्नी शाहीन बेगम यांनी परभणी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत ५० हजार रुपयांची मुदत ठेवी केली होती. या मुदत ठेवीवर त्यांनी ४५ हजार रुपयांची कर्जाची मागणी केली. त्यासाठीची संपुर्ण कागदपत्रे बँकेच्या मागणीनुसार देण्यात आली होती. परंतु तत्कालीन शाखाप्रबंधक अजित विजयकांत शुक्ला यांनी कर्जाचे वाटप मात्र केले नाही. प्रबंधक शुक्ला यांनी अक्षरश: या दाम्पत्याला त्रुटीची सेवा देत जाणीवपूर्वक वेठीस धरले. यामुळे त्रस्त झालेल्या पठाण दाम्पत्याने परभणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्या न्यायालयात तक्रार केली.

संपूर्ण कागदपत्र तपासल्यानंतर आणि दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यानंतर महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग संभाजीनगर येथील न्यायालयात पठाण दाम्पत्याने पहिले अपिल दाखल करत दोषी ठरलेल्या अधिकार्‍यांविरुद्ध कडक व कठोर कारवाई तसेच नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली.

तत्कालीन शाखाप्रबंधक अजित विजयकांत शुक्ला आणि एकूणच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेविरुद्ध ‘अनफेअर ट्रेड प्रॅक्टीस’ असा शेरा मारण्याची विनंतीही केली. त्यानुसार राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करुन दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून यात स्टेट बँक ऑफ इंडिया दोषी असल्याचे स्पष्ट केले. तसेच अर्जदार पठाण दाम्पत्याला त्रुटीची सेवा दिल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाने २० हजार रुपयांची नुकसान भरपाई आणि ५ हजार रुपये खर्चापोटी देण्याचे आदेश बजावले. जिल्हा ग्राहकमंच आणि राज्य ग्राहक आयोग या दोन्ही ठिकाणी तक्रारदार सरवर खान जाफर खान पठाण यांनी आपली स्वत: बाजू मांडली, हे मात्र विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या