छेडछाडीच्या वादातून तरुणाचा काढला काटा, परळी उड्डाण पुलावरील तो अपघात नाही खूनच

परळीच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलावर दुपारी झालेल्या अपघाताच्या घटनेत एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला होता. मात्र घटनेची परिस्थिती पाहून हा अपघात नव्हे तर खूनच असल्याचा संशय मृत तरुणाच्या कुटुंबियांनी व्यक्त केला. भावकितील छेडछाडीच्या वादातून तरुणाचा काटा काढल्याचे परळी संभाजीनगर पोलिसांनी निष्पन्न करीत केवळ एका तासातच आरोपीच्या मुसक्या आवळुन जेरबंद केले.

उड्डाण पुलावर एक मोटरसायकल आणि पिक अपच्या अपघातात तालुक्यातील डाबी या ठिकाणच्या संपत्ती भारत पारवे (23) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर निकम केरबा एंगडे हा तरुण गंभीरित्या जखमी झाला होता. त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर संभाजीनगर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा आढावा घेतला असता हा अपघात नसून खूनच असल्याचा अंदाज व्यक्त केला. पोलीस या घटनेची सखोल चौकशी केली असता तालुक्यातील डाबी गावातील भावकितील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी महिलेची छेड काढली असल्याचे त्यांना समजले. मृत तरुणाने भावकितील भावजई होत असलेल्या महिलेचा हात धरून छेड काढल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी केल्याने महिलेच्या दिराने सूड घेण्यासाठी घातपात परळीत घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या घटनेचा तपास संभाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस,सपोनि महेंद्रसिंग ठाकूर,पोह बिक्कड, पोना रुपेश शिंदे,अर्जुन मस्के, संजय कोकाटे, मोहण दुर्गे यांनी एका तासांतच आरोपी राम पारवे याच्या अंबाजोगाई शहरातून मुसक्या आवळीत जेरबंद केले.