परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांना मोक्का लावा, व्यावसायिक सोनू जलानची मागणी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी क्रिकेट बुकी प्रकरणात खोटय़ा गुह्यात अडकवून साडेतीन कोटी रुपये वसूल केल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्यासह तीन पोलीस अधिकारी, दोन शिपाई अशा एकूण 28 जणांना मोक्का लावण्याची मागणी व्यावसायिक सोनू जलान याने ठाण्याच्या सहपोलीस आयुक्तांकडे केली आहे. सोनूसह फिर्यादी असलेल्या केतन तन्ना व रियाज भाटी यांनीही ही मागणी केली असून ठाणे पोलीस याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईच्या मरीन ड्राइव्ह व त्यानंतर ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात व्यावसायिकांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह त्यांच्या पोलीस व इतर सहकाऱयांवर आता ठाणेनगर पोलीस ठाण्यातही आणखी एका खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटय़ा गुह्यात अडकवून करोडो रुपये वसूल केल्याचा आरोप फिर्यादी सोनू जलान, केतन तन्ना व रियाज भाटी यांनी केला आहे. यामध्ये सिंह यांच्या इशाऱयावरूनच त्यांच्या सहकाऱयांनी आपल्याला धमक्या देऊन आपल्याकडून कोटय़वधीची खंडणी उकळल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 28 आरोपींपैकी बऱयाच आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही जण तुरुंगात आहेत. त्यामुळे या घटनेतील सर्व आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजेच मोक्का कायदाअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादी सोनू जलान, केतन तन्ना, रियाज भाटी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या