मेट्रो व वाहतूक विभागामुळे रखडलेल्या पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या 7 वर्षांपासून मेट्रो व वाहतूक पोलीस विभागामुळे रुंदीकरणाचे काम रखडलेल्या अंधेरी (पूर्व) येथील पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. तब्बल 13 कोटी 30 लाख खर्च करून या भुयारी मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

अंधेरीतील वाढत्या वाहतूककोंडीतून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी सातत्याने पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला होता. अखेर 21 डिसेंबर 2015 रोजी या कामाचा शुभारंभ करण्याची मान्यता देण्यात आली. त्यामुळे 17 जानेवारी 2016 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या कामाच्या रुंदीकरणाचे भूमिपुजन करण्यात आले.

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे पारसी पंचायत भुयारी मार्गाच्या रुंदीकरणास परवानगी देणे शक्य नसल्याचे सहपोलीस आयुक्त, वाहतूक यांच्याकडून कळविण्यात आले. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यावर या कामास परवानगी देणे शक्य होईल, असेही वाहतूक विभागाने कळविले. वाहतूक विभागाची परवानगी मिळत नसल्याने रुंदीकरणाच्या कामास विलंब होत असल्याने अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ, कोकण भवन यांनी देखील 2 डिसेंबर 2016 रोजी या जागेची संयुक्त पाहणी करून वाहतूक परवानी देण्यासंदर्भात वाहतूक पोलीस विभाग यांना परवानगी देण्यासंदर्भात फेरविचाराची विनंती केली. परंतु मेट्रोच्या कामाचे कारण पुढे करीत वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे या कामाचा करारनामा संपुष्टात आल्याने 13 एप्रिल 2017 रोजी हा मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यात आला. हा मार्ग प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केल्यानंतरही वायकर यांनी या मार्गाच्या रुंदीकरणासाठी वांरवार पाठपुरावा केला.